( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत तथापि जिल्ह्यातील होणारी विकासकामे संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरावी या पद्धतीने पुढील काळात आपण काम करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. आज गांधी जयंती निमित्ताने आयोजित स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र शीळ / खेडशी तसेच नेहरू युवा केंद्र आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज स्वच्छता अभियान राबविण्यात आले याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील स्वच्छतेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या आरंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
स्वच्छता अभियानाच्या या कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री म्हणाले की रत्नागिरी जिल्हा पर्यटन दृष्ट्या प्रगत असा जिल्हा आहे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र स्वच्छता राखणे अतिशय महत्त्वाचे ठरते. स्वच्छतेचे हे अभियान मोहिमे पुरते न ठेवता कायमस्वरूपी स्वच्छता ठेवून या कामात आपण सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे.
कार्यक्रमास जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह तसेच नुकतेच बदलून आलेले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड, स्वामी बाळ सत्यधारी महाराज उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अमिता तळेकर, ऐश्वर्या काळुसे, रत्नागिरीचे प्रांत अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक विद्या कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
पालकमंत्री यावेळी म्हणाले की स्वच्छता आणि व्यसनमुक्ती आदी कामांमध्ये स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र या संस्थेचे काम उल्लेखनीय असे राहिलेले आहे ही संस्था अनेक वर्षांपासून शासनासोबत काम करत आहे. या स्वरूपाचे काम आगामी काळात होईल अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
परिसर स्वच्छता अत्यंत महत्त्वाची असून याबाबतीत स्वामी बाळ सत्यधारी व्यसनमुक्ती संस्थेने केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे असे यावेळी बोलताना जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेल्या या स्वच्छतेच्या उपक्रमात सर्व उपस्थित त्यांनी स्वच्छतेबाबत शपथ यावेळी घेतली व संपूर्ण कार्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला.