(मुंबई)
भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. याबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या विरोधात चेंबूर येथील एका व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्याने गुन्हा दाखल केला आहे. छगन भुजबळ यांच्यासह आणखी दोघांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सरस्वती पूजनाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्याच संदर्भातील व्हिडीओ पाठवल्यानंतर धमक्या देणारे कॉल आल्याचे तक्रारदाराने म्हटले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ललितकुमार टेकचंदानी असं तक्रार देणाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी भादवि कलम ५०६ (२) आणि कलम ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. टेकचंदानी यांनी जबाबात म्हटलं की छगन भुजबळ यांना दोन व्हिडीओ पाठवले होते. त्यामध्ये भुजबळ यांनी हिंदू धर्माचा अपमान करणारे भाषण केले होते. व्हिडीओ पाठवल्यानंतर लगेच टेकचंदानी यांना धमक्या देणारे कॉल्स आणि मेसेज यायला लागले. त्यात शिवीगाळही केल्याचा आरोप टेकचंदानी यांनी केला आहे. टेकचंदानी यांनी म्हटलं की, मला आलेल्या मेसेजमध्ये “तु भुजबळ साहेबांना मेसेज पाठवतो, तुझ्या घरी येऊन गोळ्या टाकतो, दुबईची लोकं लावतो. साहेबांना मेसेज करणं महागात पडेल” असं म्हटलं आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून टेकचंदानी यांना हे मेसेज आणि कॉल कुणी केले याचा तपास केला जात आहे.