(मुंबई/ किशोर गावडे)
बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी खरी गद्दारीच केली आहे. त्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा तरी अधिकार आहे का? असा थेट सवाल रामदास कदम यांनी काल (दि. २८) भांडुप येथे केला. बाळासाहेबांचे विचार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. उद्धवजींकडे शरद पवार यांचे विचार आहेत, असे रामदास कदम म्हणाले.
ईशान्य मुंबई मुलुंड भांडुप विक्रोळी विभागाच्यावतीने हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क यात्रा आणि शिवसैनिकांचा मेळावा भांडुप पश्चिमेच्या सह्याद्री विद्यामंदिर मध्ये संपन्न झाला. याप्रसंगी, शिवसेना नेते रामदास कदम, उद्योग मंत्री उदय सामंत, उपनेते आनंद जाधव, उपनेत्या संध्या वढावकर, मुलुंड विधानसभा प्रमुख जगदीश शेट्टी, ईशान्य मुंबई महिला विभाग संघटक राजश्री मांदविलकर, उपविभाग संघटक नेहा नंदकुमार पाटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रामदास कदम आपल्या भाषणात म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे विचार चांगले असते तर ती खरी ताकद दिसली असती तर ५० आमदार आणि १२ खासदार त्यांची साथ सोडून गेले नसते, असे कदम यांनी स्पष्ट म्हटले.
दसरा मेळाव्याला फार मोठी प्रचंड गर्दी होईल हा विश्वास उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील इतिहासातील सर्व रेकॉर्ड ब्रेक करणारा हा गर्दीचा मेळावा असेल आणि तोही वंदनीय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभेला संबोधित करतील, असे सामंत म्हणाले.
विनायक राऊत यांनी गावदेवी मंदिरात येऊन सांगावं की, तिकीट देण्यासाठी रमेश कोरगावकर यांच्याकडून पाच कोटी घेतले की नाहीत? हे खोके तुम्ही घेतलात, असा आरोप करत हिंमत असेल तर या समोरासमोर या, असे आव्हानही अशोक पाटील यांनी यावेळी केले.
ईशान्य मुंबई महिला विभाग संघटक राजश्री मांदविकर, उपविभाग संघटक नेहा पाटकर, उपनेते आनंद जाधव यांचेही सडेतोड प्रभावी भाषण झाले. यावेळी मुलुंड पूर्व आणि पश्चिम विभागातील 200 कार्यकर्त्यांनी भांडुप मधील 80 कार्यकर्त्यांनी या शिवसैनिकांच्या मेळाव्यात जाहीर प्रवेश केला.