(देवरूख/सुरेश सप्रे)
प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्था आंबव संचलित इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाने जागतिक औषध निर्माता दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना आणि उन्नत भारत अभियान विभागांअंतर्गत एसटी बस स्थानक, देवरुख येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. सदर शिबिर ग्रामीण रुग्णालय देवरूख आय सी टी सी विभाग आणि फार्मसी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन संस्थेचे चेअरमन रवींद्र जी माने यांनी केले. उद्घाटन प्रसंगी संस्थेच्या कार्याध्यक्ष सौ नेहा माने, देवरुख एसटी आगर प्रमुख पाथरे हे उपस्थित होते.
सदर शिबिरात रक्तगट, रक्तशर्करा तसेच एच आय व्ही एड्स तपासणी करण्यात आली तसेच ब्रह्मचैतन्य क्लीनिक, समर्थ क्लीनिक आणि दीर्घायुवेलनेस येथील तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. दोनशेहून अधिक एसटी कर्मचारी आणि नागरिकांनी सदर शिबिरात सहभाग नोंदवला. महाविद्यालयातील डी.एल.एल.ई. विभागाच्या विद्यार्थ्यांनी औषध निर्मात्याचे समाजातील महत्त्व या विषयावर पथनाट्य सादर करत जनजागृती केली तसेच औषध निर्माता शपथ घेण्यात आली. आरोग्य क्षेत्रातील नेहमीच दुर्लक्षिला जाणाऱ्या औषध विक्रेता असणाऱ्या फार्मासिस्टचे covid-19 काळातील व समाजाप्रति देत असलेल्या सेवेसाठी देवरुख शहरातील एकूण एकूण 29 किरकोळ औषध विक्रेत्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करणेत आला.
संस्था अध्यक्ष रविंद्र माने यांनी महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. विविध उपक्रम यशस्वी करण्यामध्ये महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल खाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.