(खेड/वार्ताहर)
खेड येथील मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांचेवर दुसरा गुन्हा दखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान लकी लॉटरीसाठी पैसे जमा करून विजेत्यांना बक्षिसे वाटप केले. मात्र यावेळी जिल्हाधिकारी किंवा धर्मादाय आयुक्त यांची परवानगी न घेता पैसे गोळा केले असा आरोप करत मानवाधिकार जर्नालिस्ट असोसिएशनचे युवा जिल्हा अध्यक्ष अरबाज असगर बडे यांनी खेड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
खेड महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज-वैभव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमान दरवर्षी खेड शहरातील छत्रपती शिवाजी चौक येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान भाविकांसाठी लकी ड्रॉ काढण्याची परंपरा असून नशीबवान भाविकांना, दुचाकी, फ्रिज, यासारखी पारितोषिके दिले जातात. गेली अनेक वर्षे लकी ड्रॉ चा खेळ सुरु आहे. मनसे आणि राजवैभव प्रतिष्ठानच्या या उपक्रमाला भाविकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
दरवर्षी या वर्षीही परंपरेनुसार लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन केले होते. गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दिवशी या लकी ड्रॉ चा निकाल जाहीर झाला आणि नशीबवान स्पर्धकांना ठरल्याप्रमाणे पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली.
पोलिसात तक्रार दाखल करणारे अरबाज बडे यांनी या संपूर्ण स्पर्धेलाच आक्षेप घेतला असून यासाठी जो खर्च करण्यात आला, ते पैसे खेड शहरातील व्यापाऱ्यांची दिशाभूल करून जमा केले असा बडे यांनी आरोप केला आहे.
बडे यांनी खेड पोलिसात जी तक्रार दिली आहे, त्यात म्हटले आहे. की, अशा प्रकारची लॉटरी काढण्यासाठी संबधीत संस्थेने किंवा मंडळाने धर्मादाय आयुक्ताची किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या परवानगीनंतरच लॉटरीसाठी पैसे जमा करता येतात आणि त्या पैश्यातून पारितोषिकांचे वाटप केले जाते. मात्र मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी धर्मादाय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांची कोणतीही परवानगी न घेता या लकी ड्रॉ लॉटरीची तिकिटे छापली, १०० रुपये प्रति तिकीट या प्रमाणे त्या तिकिटांचे वितरण केले. शिवाय खेड शहरातील व्यापाऱ्यांकडून राज-वैभव प्रतिष्ठानच्या पावत्या देऊन देणग्या जमा केल्या. राज-वैभव प्रतिष्ठानच्या वतीने स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी गैरमार्गाने लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजन केले आहे.
दरम्यान अरबाज असगर बडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीची दखल घेत खेड पोलिसांनी वैभव खेडेकर यांच्या विरोधात भारतीय दंड संहिता १८६० चे कलम ४२०, ३४ महाराष्ट्र लॉटऱ्या (नियंत्रण व कर आकारणी) आणि बक्षीस स्पर्धा (कर आकारणी) अधिनियम १९५८ ४ (१) (a ) (b ) (c ) (d ) (१) (२) (३) लॉटरी नियमन, अधिनियम १९९८ च्या ७ (३) अनव्ये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.