राजकीय व्यक्ती, लोकप्रतिनिधी, नेते नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत येत असतात. आमदार, खासदार, मंत्री यांचे विधानसभेतील विधाने, भाषणे, व्हिडीओ, चर्चा, वाद नेहमीच व्हायरल होत असतात. पण विधानसभेचं कामकाज सुरू असताना त्याकडे लक्ष देण्याऐवजी जर जनतेने निवडून दिलेली लोकप्रतिनिधी भर सभागृहातच तंबाखू मळू लागले आणि कानाला हेडफोन लावून मोबाईल गेम खेळण्यात रमू लागले, तर जनतेचे याला काय म्हणायचे?
नुकताच उत्तर प्रदेशच्या विधानसभेतला एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओत उत्तर प्रदेशचे एक आमदार महोदय दोन पुड्यांमधील महत्वपूर्ण ऐवज एकत्र करून बार भरताना दिसत आहेत, तर दुसरे आमदार महोदय चक्क कानाला हेडफोन लावून विधानसभेच्या कामकाजापासून स्वतःला दूर ठेवत मोबाईल गेमच्या जगात स्वतःला घेऊन जाताना दिसत आहेत. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली असून भाजपने मात्र या प्रकाराबाबत मौन बाळगलं आहे.