(जयपूर)
राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थक असलेले सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. गहलोत समर्थक आमदारांना सचिन पायलट यांच्याकडे राज्याची सत्ता सोपवून मुख्यमंत्री बनवण्यास विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस हायकमांडवर दबाव टाकण्यासाठी गहलोत गटाच्या सर्व आमदारांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. गहलोत गटाचे सर्व आमदार हे सभापती सीपी जोशी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करण्याची शक्यता आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. यानंतर लगेचच राजस्थानमध्ये काँग्रेससाठी राजकीय संकट उभे राहिले आहे. गेहलोत गट आमदार सचिन पायलट यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या विरोधात आहे. गेहलोत गटातील ९२ आमदारांनी राजीनाम्यावर सही केल्याचे आमदार प्रतापसिंग खाचरियावास यांनी सांगितले.
अशोक गहलोत यांनी ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यामुळे राजस्थानमध्ये मुख्यमंत्री बदलला जाण्याची शक्यता आहे. विधीमंडळच्या बैठकीत आमदारासमोर हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता की, नव्या मुख्यमंत्र्याचा अंतिम निर्णय हायकमांड करेल. तर, पक्षाच्या हायकमांडने सचिन पायलट यांना मुख्यमंत्रीपद सोपवण्याचे निश्चित केले आहे. मात्र गहलोत गटाला हे मंजूर नाही. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच राजस्थानमध्येही राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत.