रत्नागिरी जिल्ह्यामधील विश्वसनीय मिडिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘रत्नागिरी 24 न्यूज’ या कोकणातील मराठी न्यूज पोर्टलने 1 वर्षांची वाटचाल यशस्वीपणे पूर्ण करून दुसऱ्या वर्षात पदार्पण केले आहे. दोन सर्वसामान्य पत्रकारांनी लावलेले हे रोपटे आता चांगलेच फोफावले आहे. एखाद्या मिडियाच्या पदार्पणात पहिले वर्षे हा काळ काही फार मोठा नसतो, याची आम्हालाही जाणीव आहे. परंतु या अल्पावधीत आपल्या सर्वांचा भक्कम पाठिंबा आणि शुभेच्छा यामुळे आम्ही रत्नागिरी जिल्ह्यासह आणि कोकण विभागाची अत्याधुनिक मिडिया हाऊसची गरज आम्ही पूर्ण करू शकलो, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
मराठी वेबसाईटचा इतिहास साधारणतः सप्टेंबर 1996 पासून सुरू झाल्याचे दिसून येते. पहिले मराठी न्यूज पोर्टल 1998 मध्ये सुरू झाल्याची नोंद आढळून येते. फॉन्ट डाऊनलोड करावा लागणाऱ्या वेबसाईट, डायनॅमिक एनकोडिंगमधील वेबसाईट आणि युनिकोडमधील वेबसाईट अशी स्थित्यंतरे मराठी वेबसाईट्सच्या इतिहासात दिसून येतात. बरोबर एक वर्षांपूर्वी आम्ही ‘रत्नागिरी 24 न्युज डॉट कॉम’ या नावाने जिल्ह्यातील विश्वसनीय बातम्यांचे न्यूज पोर्टल सुरू केले. त्यावेळीपासून ‘डिजिटल/ऑनलाईन मीडिया’ हा जिल्हावासीयांसाठी नवीनच म्हणावा लागेल, याचं कारण जिल्ह्यात डिजिटल मिडिया रुजवण्यापासूनचे आव्हान तेव्हा आमच्यापुढे होते व आज देखील ते कायम आहे. अनेकांना डिजिटल मिडियाबाबत कमी प्रमाणात माहिती आहे. त्यामुळे निर्भिड, निःपक्षपाती आणि विश्वासार्ह पत्रकारिता करीत रत्नागिरी 24 न्यूजच्या टीमने हे आव्हान केवळ स्वीकारलेच नाही तर समर्थपणे पेलले आहे.
११ लाख २८ हजार वाचक वर्ग तर 3.४० लाखांहून अधिक युनिक व्हिजिटर्स
जिल्ह्यासह, कोकणातील वाडी-वस्तीवरील स्थानिक घडामोडींचा वेध घेणारे हे न्यूज पोर्टल इंटरनेटच्या जाळ्यातून जगभर पसरेल, याची पुसटशीही कल्पनाही आम्हाला एका वर्षांपूर्वी नव्हती. शहर व जिल्ह्यातील लोकांना हव्या असणाऱ्या स्थानिक व महत्वाच्या घडामोडी आम्ही नियमित देत गेलो आणि या उपक्रमाशी संबंधित मात्र जगभर विखुरलेले नेटीझन्स रत्नागिरी 24 न्यूजला जोडले जाऊ लागले.
जगभरातून तब्बल ११ लाख २८ हजार एकूण वाचक वर्ग तर 3 लाख 43 हजार 273 वाचकांपर्यंत (युनिक व्हिजिटर्स) पोहचण्याचे, त्यांच्या पसंतीस उतरण्याचे तसेच विश्वासास पात्र ठरण्याचे भाग्य ‘रत्नागिरी 24 न्यूज’ला मिळाले. शहर व परिसराची बित्तंबातमी देणारी अग्रगण्य वृत्तसेवा म्हणून रत्नागिरी 24 न्यूजचा नावलौकिक आहे. सुरूवातीला वेबसाईटला महिन्याला काही हजार हिट्स मिळायच्या, आता महिन्याला काही लाख हिट्स मिळतात, याचे सर्व श्रेय आम्ही आमच्या दर्शकांना देतो.
आधुनिकता आणि नाविन्याचा ध्यास घेऊन २०२१ पासून जिल्हावासीयांची सेवा करणाऱ्या रत्नागिरी 24 न्यूज टीमने मोबाईल क्रांतीनंतरची गरज लक्षात घेऊन एसएमएस न्यूज अलर्ट्स सेवा सुरू केली. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत फेसबुक पेज, व्हॉट्स अॅप बुलेटीन, ट्वीटर, यूट्यूबच्या माध्यमातून जिल्हातील ताज्या घडामोडींबाबत जगाला अपडेट ठेवण्याची कामगिरी केली आहे. प्रत्येक सोशल प्लॅटफॉर्मवरही आपले स्थान निर्माण केले आहे. नागरिकांच्या सुख-दुःखात साथ देणारा, नियमित अपडेट देणारा हक्काचा सोबती, रत्नागिरी जिल्ह्यासह स्थानिक परिसराचा आरसा, कोणत्याही पुढाऱ्याचा अथवा राजकीय पक्षाचा नव्हे तर सर्वसामान्य जनतेचा आवाज असणारे ‘रत्नागिरी 24 न्यूज डॉट कॉम’ हे न्यूज पोर्टल आता कोकण व रत्नागिरीकरांचा जणू डिजिटल मिडीयातील ‘जीवनसाथी’ बनले आहे, असे म्हटल्यास ते अतिशयोक्तीचे होणार नाही.
गेल्या एक वर्षांच्या काळात रत्नागिरी 24 न्युजचा विस्तार करून अधिक आकर्षक मांडणी असलेले यूजर फ्रेंडली न्यूज पोर्टल विकसित करण्यासाठी आमचे सातत्याने नवनवीन प्रयोग सुरू असतात. स्थानिक बातम्यांबरोबर राज्यातील व देश-विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा देण्यास तसेच आरोग्य, मनोरंजन, लाईफस्टाईल, क्रीडा, तंत्रज्ञान अशा जीवनाच्या विविध अंगांशी संबंधित अनेक लेख आणि माहिती देण्यास सुरूवात केल्याने रत्नागिरी 24 न्यूजच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली आहे.
देशासह राज्याला कोरोना सारख्या वेगवेगळया विषाणूने ग्रासले आहे. सध्याचा काळ हा सर्वांसाठीच आव्हानात्मक आहे. मात्र कोरोना महामारीच्या संकटात विश्वासार्ह डिजिटल/ऑनलाईन मीडियाची गरज अधोरेखित झाली. या संकटकाळात ‘रत्नागिरी 24 न्यूज’ टीमच्या सर्व सदस्यांनी आपला जीव धोक्यात घालून समाजाला वस्तुनिष्ठ माहिती पुरविण्याचे तसेच जनजागृतीचे काम पूर्ण क्षमतेने केले. सर्वसामान्य आणि प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून ‘रत्नागिरी 24 न्यूज’ने आपली जबाबदारी पार पाडली. अनेक अडीअडचणीतील लोकांपर्यंत मदत पोहचविण्यात ‘रत्नागिरी 24 न्यूज’ टीमचा मोठा हातभार लागला, याचे आम्हाला मनोमन समाधान आहे.
स्मार्ट सिटीमध्ये गणल्या जाणाऱ्या रत्नागिरीमधील स्मार्ट मिडिया हाऊसच्या यशामध्ये आपण सर्व वाचक, दर्शक, हितचिंतक, जाहिरातदार, तांत्रिक सल्लागार, पत्रकार, वार्ताहर, सहकारी व अन्य टीम मेंबर असे आपण सर्वजण बरोबरीचे भागीदार आहात. आपल्या भक्कम पाठबळाशिवाय ही आव्हानात्मक वाटचाल केवळ अशक्य होती. त्यामुळे वर्षपूर्ती साजरी करीत असताना आपणा सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, हे आमचे कर्तव्य आहे.
आमच्यावरील आपला विश्वास आणि प्रेम असेच पुढे अविरत राहू देत. आपण आतापर्यंत केलात त्यापेक्षा अधिक पाठबळ भविष्य काळात द्याल आणि प्रामाणिक, सकारात्मक पत्रकारितेला सामाजिक तसेच जाहिरातरुपी आर्थिक पाठबळ देखील द्याल, असा मनोमन विश्वास वाटतो.
धन्यवाद!
– टीम रत्नागिरी 24 न्यूज