(गुहागर/प्रतिनिधी)
तालुक्यातील श्रृंगारतळी येथील औरंगजेब चौधरी यांच्या मालकीच्या मदिना बेकरीमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी विजय पाचपुते यांनी पाहणी केली. या पाहणीत संशयास्पद गोष्टी आढळल्याने त्यांनी मुदतबाह्य 510 किलोचे तूप अर्थात 1 लाख 33 हजार 620 रुपयांचे वनस्पती तूप जप्त केले.
दरम्यान या बेकरीच्या ठिकाणी पाचपुते यांना अस्वच्छता आढळून आली. 20 सप्टेंबर रोजी या बेकरीतील उत्पादन दर्जाबाबत एक वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यानुसार गुहागर तहसीलदारांनी अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत पाचपुते हे टीमसह बेकरीच्या ठिकाणी पोहोचले होते. तिथे त्यांना लेबल नसलेली 12 टोस्टची पाकिटे आढळली. ही पाकिटे जागेवरच नष्ट करण्यात आली.
तसेच मुदतबाह्य 15 किलोचा 34 खोक्यातील 510 किलो वनस्पती तुपाचा साठा आढळला. हा साठाही जप्त करण्यात आला. साठयासंदर्भात बेकरीचे मालक औरंगजेब चौधरी यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे बेकरीचे उत्पादन व विक्री पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले.