( गणपतीपुळे / वैभव पवार )
रत्नागिरी शहरातील वस्तू व सेवा कर कार्यालय येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना दिनांक 17-11-2018 रोजी वस्तू व सेवा कार्यालयातील कानगुडे यांच्या केबिनमध्ये करण्यात आली होती. सदर प्रकाराबाबत वस्तू व सेवा कार्यालयातील प्रभारी अधिकारी स्वप्नाली चव्हाण यांनी लेखी तक्रार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली होती.त्यानुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.क.२९५( अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. परंतु सदर प्रकरणाला आज रोजी चार वर्षे पूर्ण झाली असून सदर प्रकरणाविषयी आंबेडकरी संघटनांना कुठलीच माहिती नाही. म्हणून याविषयी रत्नागिरी येथील शहर पोलीस ठाण्याला पुन्हा कल्पना देण्याच्या उद्देशाने भिम युवा पॅंथर रत्नागिरी संघटनेने नुकतेच स्मरणपत्र दिले आहे.
रत्नागिरी येथील वस्तू व सेवा कार्यालयातील कर्मचारी कानगुडे यांच्या कार्यालयात सन 2018 मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर रत्नागिरी शहरातील व रत्नागिरी तालुक्यातील भीमसैनिक व विविध आंबेडकरी संघटना मोठ्या संख्येने एकवटले होत्या. तसेच त्यावेळी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालयावर विविध आंबेडकरी संघटनांनी एकत्रित येऊन मोठा मोर्चा काढला होता. त्यानंतर या निंदनीय प्रकाराचा जाहीर निषेध ही मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.परंतु सदर प्रकाराबाबत कायदेशीररित्या रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर अद्यापही संबंधित आरोपीला अटक किंवा कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे याविषयीची गंभीर दखल घेऊन भीम युवा पॅंथर रत्नागिरी संघटनेने रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आपले पत्र सादर केले आहे.
या पत्रात त्यांनी म्हटले आहे की ,सदर प्रकाराबाबत रत्नागिरी येथील वस्तू व सेवा कार्यालयातील प्रभारी अधिकारी स्वप्नाली चव्हाण यांनी लेखी तक्रार दिली असून आपल्या शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल केला आहे सदर प्रकरणाला आज रोजी चार वर्षे पूर्ण झाली असून सदर प्रकरणाविषयी कोणतीच माहिती नाही सदर प्रकरणात गुन्हेगारास लवकरात लवकर पकडण्यात यावे व त्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आली परंतु अशा प्रकारची कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे प्रथमदर्शनी जाणवते.
सदर प्रकरणाची आपण कोणत्या प्रकारे कार्यवाही केली व त्यातील गुन्हेगार सापडले का ? याची माहिती आम्हांस मिळावी व सदर प्रकरणाचा आम्हांस न्याय द्यावा अशी आम्ही या पत्राद्वारे संघटनेच्या माध्यमातून मागणी करीत आहोत तसेच आम्हांंला योग्य न्याय मिळत नसल्यास आम्हाला आपल्या शहर पोलीस स्टेशनवर संघटनेच्या वतीने मोर्चा काढावा लागेल याची आपण दक्षता घ्यावी, असे आपल्या पत्रात म्हटले आहे यावेळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याला पत्र देताना भिम युवा पॅंथर रत्नागिरीचे अध्यक्ष प्रीतम आयरे, उमेश कदम, तुषार पवार, शरद सावंत, रवी पवार, समीर जाधव, सुजित चवेकर आदी उपस्थित होते. या पत्राची रत्नागिरी येथील शहर पोलीस ठाण्याकडून तात्काळ काय दखल घेतली जातेय् याकडे रत्नागिरी तालुक्यातील संपूर्ण आंबेडकर अनुयायांचे लक्ष लागून राहणार आहे.