तालुक्यातील आबलोली बाजारपेठेत पोलीसांनी 11 दुकानदारांवर कारवाई केली. बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सुरु असल्याचे निदर्शनास आल्यावर तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आणि सरपंच यांनी पोलीसांकडे फिर्याद दिली. त्याप्रमाणे कारवाई करताना 11 दुकानमालकांवर साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुहागर पोलीस ठाण्यात तलाठी आनंद शशिकांत काजरोलकर यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे मंगळवार 11 मे रोजी सकाळी 10 वा. आबलोलीतील सरपंच तुकाराम पागडे, ग्रामसेवक बाबुराव सुर्यवंशी, पोलीस पाटील महेश भाटकर आणि तलाठी काजरोलकर यांनी आबलोली बाजारपेठेची पहाणी केली.
जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत असताना अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त 11 दुकाने सुरु असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे तलाठी आनंद काजरोलकर यांनी कापड दुकानदार गणेश तोडकरी, राजेश तोडकरी, हेमंत पंडीत, दिपा काळे, इलेक्ट्रॉनिक्स दुकानदार दिपक बादवटे, प्रकाश मांडवकर, शिवणकाम करणाऱ्या शारदा राठोड, चप्पल दुकानदार सुधीर काजरोळकर, अनिल पालशेतकर, चणेवाले बाळकृष्ण चौगुले, स्टील ट्रेडर्स धुका देवशी या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश मोडल्याची तक्रार पोलीसांकडे केली. त्यावरुन गुहागर पोलीसांनी या 11 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अरविंद बोडके स्वत: सहभागी झाले होते. त्याच्यासोबत पोलीस नाईक स्वप्नील शिवलकर, हवालदार नाना शिंदे, संतोष साळसकर, चालक नारकर सहभागी झाले होते.
या दुकानदारांवर भारतीय दंड संविधान कलम 188, 269, 270, भारतीय साथ रोग अधिनियम 1897 चे कलम 3, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास पोलीस नाईक स्वप्नील शिवलकर करत आहेत. पोलीसांच्या कारवाईनंतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून उर्वरित बाजारपेठ बंद आहे