पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर पोलीसांनी तब्बल चार लाख, 58 हजार, 200 रुपयांचा दंड वसुल केला. यामध्ये वाहनचालक, दुकानदार, विनाकारण फिरणाऱ्या व्यक्ती, मास्क न घालता फिरणाऱ्या व्यक्ती तसेच एका विवाह समारंभावरील कारवाईचा समावेश आहे.
गुहागर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीतील गर्दी कायमच अनियंत्रित असते. त्यामुळे कोरोनाच्या काळात गुहागर पोलीसांनी आपला ठिय्या शृंगारतळीतच बसवला होता. 13 एप्रिलला ब्रेक द चेन या अभियानांतगर्त राज्यात टाळेबंदी सदृश्य निर्बंध लावण्यात आले. या निर्बंधाचा भंग करणाऱ्यावर कायदेशीर, दंडात्मक कारवाईचे अधिकार पोलीसांना देण्यात आले. त्यामुळे गुहागर पोलीसांनी शृंगारतळीत वाहने, दुचाकीचालक यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरु केली. 13 एप्रिल ते 12 मे या कालावधीत पोलीसांनी 680 वाहनचालकांवर मोटारवाहन अधिनियमांतर्गत कारवाई केली. त्यातून 3 लाख 10 हजार 200 रुपयांचा दंड पोलीसांनी वसुल केला. या कारवाईमध्ये ४ खासगी प्रवासी वाहनांकडून प्रत्येकी 10 हजारप्रमाणे 40 हजाराचा दंडही अंतर्भूत आहे.