(ठाणे/किशोर गावडे)
नालासोपारा पूर्वेकडील नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सदर व्यक्तीची हत्या झाली की, त्याने आत्महत्या केली ? याचा तपास तुळींज पोलीस करीत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील देशमुख फर्मच्या लगत असलेल्या नाल्यात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना दिसला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी मृतदेहाजवळ एकच गर्दी केली. मृतदेहाजवळ जमा झालेल्या काही नागरिकांनी मृतदेहाबाबत पोलिसांना माहिती दिली. खबर मिळताच तुळींज पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सदर मृतदेह हा 40/42 वर्षीय देवेंद्र सिंग यांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याचे समजते. सदर व्यक्तीची विरार पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे असे समजते.
देवेंद्र सिंग हे सेल्समन होते, अशी प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यांच्याकडे एक पिशवी सापडली असून त्यात एक मोबाईल व कंपनीची कागदपत्रे सापडली आहेत. त्यांची हत्या की आत्महत्या याचा तपास तुळींज पोलीस करीत आहेत.