[ संगमेश्वर /प्रतिनिधी ]
शंभरी ओलांडली तरीही वाढत्या रहदारीचा भार सोसणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असलेला सोनवी नदीवरील पुल दुरूस्ती अभावी धोकादायक बनत आहे. या पुलावर मोठं-मोठें खड्डे पडल्याने या पुलाबाबत दिवसेंदिवस नागरिकांमध्ये भीती निर्माण होत आहे. पुलावरून अवजड वाहने गेल्यास पुलाला हादरे बसल्याचे जाणवत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा असलेला हा पूल जवळपास १०० वर्षापूर्वीचा आहे. ब्रिटिशकालीन पुलावरून होणारी वाहतूक लक्षात घेता अपघाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र आहे.
1910 नंतर ब्रिटीशांनी मुंबईला गोव्याशी जोडण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर ठीकठिकाणी छोटे मोठे पूल उभारण्यात सुरुवात केली. यापैकी तालुक्यातील गडनदीवर आरवली पूल हा 1939 साली उभारण्यात आला. त्यानंतर शास्त्री व सोनवी पुलाची उभारणी करण्यात आली. सोनवी पूल हा 62 मीटर लांबीचा आहे. त्याची रंदी कमी असल्याने एकाचवेळी एखादे अवजड वाहन गेले तर रिक्षाही सहजगत्या जावू शकत नाही. अशी स्थिती असूनदेखील संबंधित विभागाचे अधिकारी या पुलाकडे पूर्णतः दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
नवा पूल लवकरच उभारावा
पाच वर्षांपूर्वी सावित्री नदीवरील पुलाची दुर्दैवी घटना घडली होती. महाड-रायगड मार्गावरील सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पूल कोसळल्याने २०१७ मध्ये मोठी जीवितहानी झाली होती. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. ही प्रार्थना स्थानीक नागरिक करत असतात. पुलाचे कठडे ढासळलेल्या व खड्डेमय पुलावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हा पूल अतिशय धोकादायक बनला आहे. वाहने पेलण्याची क्षमता शिल्लक राहिली नसल्याने या पुलाची तातडीने दुरूस्ती करून तयार होणारा नवा पुल लवकरात लवकर उभारावा, अशी मागणी नागरिक करत आहे