( मंडणगड / प्रतिनिधी )
सार्वजनिक बांधकाम विभागातून अभियंता पदावरून सेवानिवृत्त झालेले मंडणगड गांवचे सुपुत्र मोहन पांडुरंग महाडिक यांना राज्य शासनाचा ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने गौरविण्यात आले. आज १५ सप्टेंबर रोजी ‘अभियंता दिना’च्या मुहूर्तावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. मुंबईत ‘षण्मुखानंद हॉल’मध्ये सकाळी दहा वाजता हा शानदार समारंभ पार पडला. व्यासपीठावर सर्वश्री मनोज सौनिक (अतिरिक्त मुख्यसचिव,सा.बां. विभाग), श्री. साळुंखे, सचिव (रस्ते), श्री. नवघरे, सचिव (इमारती) सा.बा.विभाग, श्री. वांढेकर,सचिव , श्री.संदीप पाटील, मुख्य अभियंता (विद्युत) हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.श्री. महाडिक यांची २०१५ सालच्या या सन्मान्य पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती, परंतु करोनाजन्य परिस्थितीमुळे समारंभ होऊ शकला नव्हता.
एकेकाळी ‘कोंकणचे अंदमान’ म्हटले जाणारे, आणि काळाच्या ओघात विकसित होऊनही आजही उपेक्षित राहिलेल्या मंडणगड येथे मोहन महाडिक यांचा जन्म झाला. तेथील नूतन विद्यामंदिरात प्राथमिक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करून त्यांनी रत्नागिरीच्या ‘शासकीय तंत्रनिकेतन’मधून १९८३ साली विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका प्राप्त केली. १९८४ मध्ये ते महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ‘कनिष्ठ अभियंता’ पदावर शासकीय सेवेत रुजू झाले. त्यांच्या कर्तव्याचा शुभारंभ नवीन विधान भवन येथे झाला, आणि मंत्रालयात सेवेचा अखेरचा कालखंड पूर्ण करून ३१ मे २०१९ रोजी विहित वयोमानानुसार ते निवृत्त झाले.
शासनाच्या हिवताप विभागात सेवेत असणारे आपले वडील पांडुरंग यांनी कठीण परिस्थितीला तोंड देऊन आपल्याला उच्च शिक्षण दिल्यामुळे हा भाग्याचा दिवस दिसला, अशा शब्दांत श्री. महाडिक यांनी आपला आनंद व्यक्त केला. आपल्या या यशस्वी वाटचालीत आपल्या पत्नीचे आणि मुलांचे सहकार्य मोलाचे आहे, असेही ते म्हणाले. त्यांच्या पत्नी सौ. सुचिता या महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागात सहसचिव पदावर कार्यरत आहेत. उपजत बुद्धिमत्तेला परिश्रम, प्रयत्न आणि कर्तव्यतत्परता यांची जोड दिली तर खडतर आणि उपेक्षित ग्रामीण भागातील व्यक्तीही उच्च हुद्दा आणि बहुमानाचा पुरस्कार प्राप्त करू शकते, याचे उदाहरण महाडिक पती-पत्नींनी आपल्या कृतीने घालून दिले आहे. या सुयशाबद्दल श्री महाडिक यांच्यावर मंडणगडमधून तसेच त्यांच्या सहकारी व मित्रमंडळातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
श्री. मोहन पांडुरंग महाडिक यांच्या कारकीर्दीचा गौरवपूर्ण आलेख :-
• तत्कालीन शाखा अभियंता (विद्युत) म्हणून १९८४ ते १९९० या कालावधी मध्ये नवीन विधान भवन येथे कनिष्ठ अभियंता (विद्युत)
• विधान मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्युत विभागाकडून सक्रिय सहभाग.
• १९९० ते १९९५ या कालावधी मध्ये ‘राजभवन’, मुंबई येथे विद्युत संच मांडणीचे उत्कृष्ट काम
• २६ जुलै २००५ रोजी झालेल्या अतिवृष्टीने शासकीय वसाहत, बांद्रा येथील शासकीय इमारतीमध्ये पहिल्या मजल्यापर्यन्त पाणी भरले होते. सुरक्षेच्या कारणास्तव तळमजल्यावर असणारा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामूळे दहा दिवस वीज पुरवठा बंद होता. सन २००६ ते २००८या काळात विद्युत विभागाने शासकीय वसाहत येथील तळमजल्यावर असणारे वीज मीटर, पहिल्या मजल्यावर स्थलांतरित केले. या कामी श्री. महाडिक यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते.
• २०१० ते २०१३ या कालावधी मध्ये श्री. महाडिक यांनी उच्च न्यायालयात शाखा अभियंता विद्युत म्हणुन काम केले. उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये विद्युत विभागाकडून त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते, त्याबद्दल त्यांना ‘मुंबई उच्च न्यायालया’चे मुख्य न्यायमूर्ती महोदयांकडून प्रशस्तीपत्राने गौरव.
• २०१३ ते २०१९ या कालावधीमध्ये मंत्रालय येथील विद्युत संच मांडणी, वातानुकूल यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, कॅबिनेट हॉल मधील विविध यंत्रणांच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण