( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या घराकडे बघत असल्याचा गैरसमज करुन घेत एका महिलेच्या पतीला व मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद शिरीन एजाज नाखवा (40, मुस्लीमवाडी, शिरगाव) यांनी शहर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार समिया मेहताब साखरकर, मुस्कान मेहताब साखरकर, बासिद मेहताब साखरकर, मेहताब साखरकर (सर्व रा. मुस्लीमवाडी, शिरगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. ही घटना 8 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वा. च्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार 12 सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिरीन नाखवा यांनी आपल्या मुलीला टयुशन करीता समोरील घरामध्ये पाठवले होते. मात्र आपली मुलगी तिथे मस्ती करत आहे का? हे पाहण्यासाठी त्या नेहा हुश्ये यांच्या घरी गेल्या. याचदरम्यान शिरीन नाखवा आणि त्यांची मुलगी या घरासमोर राहणार्या समिया साखरकर यांच्या घराकडे बघत असल्याचा गैरसमज झाल्याने मुस्कान, बासिद, मेहताब, समीया यांनी फिर्याद यांचे पती एजाज व त्यांचा मुलगा अर्सलान यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच शिरीन यांचे केस धरुन डोके भिंतीवर आपटले त्यामुळे शिरीन यांच्या डोक्याला आणि नाकाला व डोळयाला दुखापत झाली. याप्रकरणी शिरीन यांनी पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार चौघांविरोधात भादविकलम 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.