[ मुंबई ]
ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून रंगणाऱ्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप २०२२साठी बीसीसीआयने सोमवारी टीम इंडियाची घोषणा केली. मागील वर्षभरात अनेक युवा खेळाडूंना आजमावून बघितल्यावर तब्बल ७ वेळा कर्णधार बदलल्यानंतर अखेर वर्ल्ड कपसाठी अंतिम १५ जणांची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियातील या १५ शिलेदारांना आशिया कपच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचू न शकल्याचे शल्य बाजूला ठेवत वर्ल्ड कपमध्ये कामगिरीचा स्तर उंचवावा लागणार आहे. टीम इंडियाचे कर्णधारपद रोहित शर्माकडेच कायम ठेवण्यात आले असून के. एल. राहुल उपकर्णधार असेल. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे त्याच्या जागी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे, तर संघात ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक असे २ विकेटकिपर असतील. टीम इंडिया टी-२० वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकांत खेळून वर्ल्ड कपची तयारी करण्यात येईल.
भारतीय संघातील खेळाडू
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन अश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल,अक्षर पटेल.
राखीव खेळाडू : मोहम्मद शमी, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.