(नवी मुंबई )
लोकाभिमुख प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री सचिवालय कक्षात’ स्थापनेपासून आता पर्यंत १ हजार ४७९ तक्रारी अर्ज प्राप्त झाले असून सर्व अर्ज निकाली काढण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त महसूल तथा कोकण विभागीय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी मकरंद देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानूसार २० जानेवारी २०२० रोजी कोकण विभागीय आयुक्त कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील कक्ष क्रमांक ११७ मध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापित करण्यात आले. दि. २० जानेवारी २०२० ते ३१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत कोकण विभागाच्या विविध ठिकाणांहून, मुख्यमंत्री यांना संबोधून करण्यात येणारे अर्ज, निवेदने असे एक हजार ४७९ अर्ज प्राप्त झाले होते. त्याप्रैकी ५१२ अर्ज क्षेत्रिय कार्यालयांकडे पाठविण्यात आले, २३० अर्ज मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालय कार्यालयाकडे पाठविण्यात आले आणि ७३७ अर्ज क्षेत्रिय कार्यालयाकडून निकाली काढून घेण्यात आले आहेत.
कोकण विभागात एकूण १५२ प्रमुख क्षेत्रिय कार्यालये आहेत. त्यापैकी सर्वात जास्त म्हणजे १७३ तक्रारी अर्ज हे नवी मुंबई महानगरपलिके संबंधित होते, तर रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित ११२ अर्ज होते आणि नवी मुंबईतील सिडको संबंधित १२१ तक्रारी अर्ज होते.