(रत्नागिरी)
कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना खुशखबर आहे. कारण प्रवाशांना प्रवास अधिक गतिमान व पर्यावरणपूरक करण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ज्या स्थानकांपर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले आहे, त्या मार्गावर १५ सप्टेंबरपासून प्रवासी रेल्वे गाड्या टप्प्याटप्प्याने डिझेल ऐवजी विद्युत इंजिनवर चालविल्या जाणार आहेत. डिझेल ऐवजी विजेवर रेल्वे धावू लागल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रदूषण बऱ्याच अंशी कमी होणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त व गतिमान प्रवासासाठी आता तयार झाल्या आहेत. कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकूर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर मालगाड्या सोडून सर्व प्रवासी गाड्या डिझेलवर चालत आहेत. मात्र, आता या कामातील रत्नागिरी येथील टीएसएस (ट्रॅक्शन सबस्टेशन) पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने या मार्गावर टप्प्याटप्प्याने प्रवासी गाड्या विजेवर चालवल्या जाणार आहेत.
दादर सावंतवाडी तुतारी तसेच मंगला एक्सप्रेस पहिल्या टप्प्यात म्हणजे १५ सप्टेंबर २०२२ पासून तर मांडवी एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस तसेच दिवा सावंतवाडी सिंधुदुर्ग एक्सप्रेस २० सप्टेंबर २०२२ पासून विजेवर चालणार आहेत. मुंबई- मंगळुरू एक्सप्रेस १ जानेवारी २०२३ पासून विजेवर चालणार आहे. मुंबई सीएसएमटी ते करमाळी तेजस एक्सप्रेस पुढच्या महिन्यात म्हणजेच १५ ऑक्टोबर २०२२ पासून विजेच्या इंजिनासह चालवली जाईल.