(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक शिक्षण प्रसारक मंडळ धामणसे संचलित धामणसे हायस्कूलचे उपक्रमशील ज्येष्ठ शिक्षक संभाजी जगन्नाथ भोसले यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ सोमवार दि.१२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता धामणसे माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
संभाजी भोसले हे धामणसे माध्यमिक विद्यालयात १९९६ साली रुजू झाले. हिंदी आणि इतिहास विषय ते अतिशय रंजक पद्धतीने शिकवितात. अतिशय मेहनती अध्यापक असून त्यांनी आपल्या विषयाचे बोर्ड परीक्षेचे सर्वात्तम निकाल लावले. शिक्षण संस्थेच्या व विद्यालयाच्या विविध उपक्रमात ते सक्रिय सहभाग घेत अनेक सहशालेय उपक्रम त्यांनी संपूर्ण स्टाफच्या माध्यमातून यशस्वी केले आहेत.
संभाजी जगन्नाथ भोसले हे नियत वयोमानानुसार ३१ ऑगस्ट रोजी शिक्षकी पेशातून निवृत्त झाल्याने त्यांचा शुभेच्छा समारंभ सोमवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता धामणसे माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
संभाजी भोसले हे विद्यार्थी व पालक प्रिय शिक्षक होय.हिंदी व इतिहास विषयाचे अध्यापन करून त्यांनी अनेक विद्यार्थी बोर्ड परीक्षेत चमकविले.शाळेची गुणवत्ता आणि निकालाची यशस्वी परंपरा अबाधित राखली. संभाजी भोसले यांच्या अध्यापन शैलीचे अनेक विद्यार्थी आजही कौतुक करताना दिसतात. अतिशय बारकाईने वाचन करून इतिहासकालिन हुबेहूब प्रसंग ते उभे करत आले आहेत. एखादे हाती घेतलेले काम निष्ठेने आणि जिद्दीने तडीस नेण्यात त्यांचा हातखंडा आहे.वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने त्यांनी परिवर्तनवादी मोफत पुस्तके मित्रमंडळींना देण्याचा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
वाचाल तर वाचाल या उक्तीप्रमाणे भोसले सरांनी वाचनातून आपला व्यासंग वाढविला. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांना वाचनासाठी ते सतत प्रेरित करतात. स्वत: पदरमोड करून ग्रंथालय, वाचनालय, समविचारी मंडळींना ते उत्स्फर्तपणे पुस्तक देण्यात धन्यता मानत आले आहेत. भारतीय संविधान, लोकशाही, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक परिवर्तनाची शेकडो पुस्तके त्यांनी अनेकांना विनामूल्य वितरित केली आहेत.
संभाजी भोसले यांच्या सेवानिवृत्ती प्रित्यर्थ शुभेच्छा समारंभ धामणसे शिक्षण संस्था व विद्यालयाने आयोजित केला आहे.या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी परिसरातील माध्यम शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी उपस्थित राहणार आहेत.