[ दापोली / प्रतिनिधी ]
१ ऑगस्टपासून सुरु झालेल्या मासळी उद्योगाच्या हंगामामध्ये मासेमारीला गेलेल्या मच्छीमारापैकी फक्त ५० टक्के मच्छिमारांनाच बऱ्यापैकी फायदा झाला असून उर्वरित मच्छिमारांना मात्र वातावरणामुळे मोठा फटका बसला आहे. गणेशोत्सवामुळे हणै बंदरातील मासेमारी ठप्पच आहे. आजच्या परिस्थितीत ९५ टक्के नौका हंगाम सुरु हाऊनदेखील आंजर्ले खाडीतच उभ्या आहेत. अनंत चतुर्दशीनंतर वातावरण पोषक झाले, तरच मासळी उद्योग व्यवस्थितीरित्या सुरु होईल, असे येथील मच्छिमार बांधवांनी सांगितले.
गेल्या १५ दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. १ ऑगस्ट या मुहुर्ताच्या दिवशी वातावरण चांगले होते. परंतु दोन दिवसांनी वातावरण बिघडले. मासेमारीकरिता गेलेल्या मच्छिमारांची धावपळ उडाली. मुहुर्ताच्या सुरवातीच्या दोन दिवसात जेमतेम नौका ५० मासेमारीसाठी समुद्रात गेल्या होत्या. पुढे वातावरण पोषक बघून एकूण किमान १२५ नौका मासेमारीकरिता समुद्रात गेल्या होत्या. मासेमारीस गेलेल्या मच्छीमारांपैकी ५० टक्केच मच्छिमारांना फायदा झाला. उर्वरित मच्छीमारांचे मात्र चांगलेच नुकासान झाले आहे. किमान एकदा मासेमारीकरिता जाण्यासाठी सर्व सामान, डिझेल, सहा खलाशी, आणखी काही सामानासाठी किमान लाख-दीड लाख रुपये खर्च येतो. सध्या मच्छीमार बांधवांची आर्थिक स्थिती खूपच खालवली आहे. २०१८पासून डिझेल परतावाच मिळालेला नाही. परतावा जर मिळाला, तर मच्छिमारांना या हंगामात उद्योग सुरु करण्यास उपयुक्त ठरेल. हर्णे बंदरात हंगामामध्ये आजुबाजूच्या गावांमधील मिळून ८०० ते ९०० नौका मासेमारीकरिता येतात.