[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात सहभागी झाल्याबद्दल उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांना मालगुंड येथे युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने काळे झेंडे दाखविण्यात आले.
शिवसेनेशी गद्दारी करून शिंदे गटात गेलेल्या आमदारांविरोधात अनेक ठिकाणी नाराजी व्यक्त केली जात असून मालगुंड येथे प्रथमच त्याचे पडसाद उमटले आहेत. शिवसेनेचे रत्नागिरी तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांच्या घरातील विघ्नहर्त्यांचे दर्शन घेण्यासाठी ना. उदय सामंत गेले होते. याची माहिती मिळताच युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्र जमा झाले.
युवा सेना विभाग अधिकारी रोहित साळवी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी ना. उदय सामंत यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. शाखाधिकारी मंदार पांचाळ, प्रशांत नांदगावकर, प्रथमेश पवार, प्रवीण पांचाळ, विपुल देसाई, निहार देसाई, योगी साळवी, शुभम साळवी, आशिष साळवी, स्वस्तिक साळवी, बावा आग्रे, संतोष चौघुले, दशरथ साळवी, शशांक साळवी, सागर मेस्त्री आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी उद्योगमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू नका असा सल्ला दिला होता. लोकशाही मार्गाने आंदोलन करून उद्योगमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आल्याचे रोहित साळवी यांनी सांगितले.