गणपती बाप्पा म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर येते ते त्यांचे मनोहर स्वरूप, मोठे कान, लंबोदर, चतुर्भुज आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोठी सोंड, वाहन उंदीर आणि हाच आपला बाप्पा विघ्नहर्ता आणि सुखकर्ता मानला जातो. त्याची अनेक विविध रूपे आपल्याला मोहित करतात. तर महाभारताचा लेखक म्हणून गणपतीकडे पाहिले जाते. अन्य देवतांप्रमाणे गणपतीनेही प्रत्येक युगात अवतार घेतले आहेत. गणपतीचे अनेक अवतार खूप प्रसिद्ध आहेत. जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते. गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही. मात्र,दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी म्हणजे, मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे. आदी विनायक असे या मंदिराचे नाव आहे. गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या मूर्तीमुळे याला आदी गणपती संबोधले जाते.
गणपतीचे मंदिर असलेल्या या भागाला तिलतर्पणपुरी असे संबोधले जाते. मात्र, यामागे एक कथा आहे. ही कथा श्रीरामचंद्रांशी निगडीत आहे. एका पौराणिक कथेनुसार, प्रभू रामचंद्र हे आपला पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले. मात्र, पिंडदान केल्यावर त्या पिंडाच्या जागी किडे दिसू लागले. श्रीरामांनी पुन्हा पिंडदान केले. मात्र, पुन्हा तेथे किडे दिसून लागले. असे अनेकदा घडल्यावर शेवटी श्रीरामचंद्रांनी महादेव शिवशंकराची आराधना केली.
महादेवांची आराधना केल्यानंतर महादेव तेथे प्रकट झाले आणि श्रीरामांना सांगितले की, मंथरावन येथे जाऊन श्राद्ध करावे. महादेवांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार, श्रीरामांनी तत्कालीन मंथरावन येथे जाऊन पिंडदान केले. आश्चर्य म्हणजे श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते, त्या ठिकाणी त्या चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली. आजच्या काळातही ती शिवलिंगे तेथे पाहायला मिळतात. हा भाग येथे मुक्तिश्वर म्हणून ओळखला जातो. अनेक जण पितरांना मुक्ती मिळावी म्हणून तिलतर्पणपुरी येथे जाऊन श्राद्ध करतात.
तिलतर्पणपुरी तीर्थाजवळच हे विशेष गणेशमंदिर आहे. हे जगातील एकमेव मानवी मुख असलेल्या गणेशमूर्तीचे मंदिर आहे. महादेव शिवशंकराने गणेशाचे मानवी शीर भंग करण्यापूर्वीचे हे गणेश रूप आहे, असे मानले जाते. म्हणूनच याला आदि गणेश (आद्य गणेश) किंवा नरमुख गणेश म्हणतात. या गणेशाला चार हात आहेत व त्याचा चेहरा भाऊ कार्तिकस्वामी म्हणजे मुरुगन यांच्यासारखा आहे. हा गणपती आपला उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसला आहे. या गणेशाची खुद्द अगस्ती ऋषी हे दर संकष्टी चतुर्थीला आराधना करीत असत. या गणेशाची भक्ती केल्याने कुटुंबामधील आई-वडील, नवरा-बायको, मुलेबाळे यांच्यामधील संबंध उत्तम राहून कुटुंबामध्ये सलोखा राहतो, उत्तम प्रगती होते. लहान मुले आणि विद्यार्थी यांची स्मरणशक्ती वाढते, असा येथे येणाऱ्या भक्तांचा ठाम विश्वास आहे