देशातील भ्रष्टाचाराचे कुतुबमिनारहूनही उंच प्रतीक असलेल्या राजधानी दिल्लीलगतच्या नोएडा सेक्टर ९३ मधील ‘सुपरटेक’ चे बेकायदा टॉवर रविवारी दुपारी २.३० वाजता स्फोटकांनी उडवून देण्यात आले. अद्ययावत इम्प्लोजन तंत्रज्ञानाचा वापर करून शंभर मीटरहून अधिक उंचीचे हे दोन्ही टॉवर्स अवघ्या १२ सेकंदात जमिनीवर आले. हे तंत्रज्ञान वापरून असे अवाढव्य बांधकाम पाडले जाण्याची भारतातील ही पहिलीच घटना ठरली आहे.
टॉवर्स पाडण्यापूर्वी परिसरातील सात हजारांवर रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. टॉवर्सचा जवळपास ६० हजार टन राडारोडा १५ कोटी रुपयांना विकला जाणार आहे. एक टॉवर २९ (उंची ९७ मीटर), तर दुसरा ३२ मजली (उंची १०३ मीटर) होता. दोन्ही टॉवर जमीनदोस्त करण्यासाठी सुमारे १७.५५ कोटी रुपयांचा चुराडा झाला. हा खर्चही अर्थात ‘सुपरटेक’ कडूनच वसूल केला जाणार आहे.
दोन्ही टॉवर्समध्ये ९ हजार ६४० भोके पाडून त्यात ३ हजार ७०० किलो स्फोटके भरण्यात आली होती. प्रत्येक भोकात १४०० ग्रॅम गनपावडर ओतली गेली होती. ३२५ किलो सुपर पॉवर जेल, ६३,३०० मीटर सोलर कार्ड, सॉफ्ट ट्यूब, जिलेटिन रॉड, १०, १०० डिटोनेटर आणि ६ आयईडीचा वापर केला गेला. या सर्व पूर्वतयारीला १८१ दिवस लागले. इमारती उडवून देण्यापूर्वी सायरन वाजवण्यात आला. घड्याळाचा काटा अडीचवर जाताच बटण दाबले गेले. वरून खालच्या दिशेने एकापाठोपाठ स्फोट होऊन अवघ्या १२ सेकंदांत दोन्ही उत्तुंग इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. टॉवर्स कोसळताना पाहण्यासाठी जत्रा असावी इतकी प्रचंड गर्दी झाली होती.
विध्वंस तज्ज्ञ चेतन दत्ता यांनी ब्लॅक बॉक्सला जोडलेले हँडल १० वेळा फिरवले. लाल बल्ब लुकलुकायला लागला. चार्जर स्फोटासाठी तयार आहे, असा सिग्नल मिळताच दत्ता यांनी हिरवे बटण दाबले.