(रत्नागिरी)
रत्नागिरी नगर परिषद निधीमधून सुरू असलेली अनावश्यक कामे तत्काळ थांबवावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेता सुदेश सदानंद मयेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याकडे गुरुवारी निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, रत्नागिरी नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींची मुदत २७ डिसेंबर २०२१ रोजी संपुष्टात आल्यापासून आपण नगर परिषदेचे प्रशासक व मुख्याधिकारी अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत आहात. सध्या सोशल मीडियावर रत्नागिरी नगर परिषदेच्या आर्थिक स्थितीबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध होत आहेत. नगर परिषदेच्या तिजोरीत पैसे नसल्यामुळे हे वीजबिल भरता न आल्याचे यातून पुढे आले आहे. ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असून, रत्नागिरीला निश्चितपणे भूषणावह नसल्याचे मत मयेकर यांनी यात नोंदविले आहे.
सध्या नगर परिषदेच्या बहुसंख्य विभागांमध्ये मक्ता पद्धतीने कर्मचारी कार्यरत असून, त्यांचे गेल्या दोनतीन महिन्यांचे वेतनही थकीत आहे. तसेच रत्नागिरी नगर परिषदेच्या पथदीपांचे सुमारे तीस लाख रुपयांचे वीजबिलही थकीत आहे. नगर परिषदेचे कायम आस्थापनेवर काम करणारे कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांनाही मासिक वेतन / निवृत्तीवेतन हे दरमहाचे ५ तारखेपर्यंत अदा केले जात नसल्याचे निदर्शनास आणून दिले.
लोकप्रतिनिधी म्हणून मी १५ वर्षे नगर परिषदेमध्ये कार्यरत होतो, त्यावेळीही आम्ही एखादे लोकहिताचे काम सुचविले तर आम्हाला अंदाजपत्रकामध्ये तरतूद शिल्लक नाही, त्यामुळे काम करता येणार नाही असे सांगितले आहे. परंतु, आत प्रशासकीय राजवट अस्तित्वात आल्यापासून नगर परिषद निधीमधून शहरामध्ये बरीच कामे हाती घेतल्याच अथवा पूर्ण केल्याचे दिसत आहे. य बाबी अतिशय गंभीर स्वरुपाच्य आहेत. याला वेळीच पायबंद घालावा नगर परिषद निधीमधून सध्या जी कामे प्रस्तावित अथवा सुरू आहेत ती तत्काळ थांबवावीत व कर्मचारी वेतन निवृत्तीवेतन, मक्त्यांवरील कर्मचाऱ्यांचं वेतन हे सर्वोच्च प्राधान्याने करावे, अशी मागणीही मयेकर यांनी केली आहे.