(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गाची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. महामार्गाचे अर्धवट काम आणि पडलेले खड्डे यामुळे वाहने चालविणे मुश्किल झाले आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईकर मोठ्या प्रमाणात गावी येणार असून, त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी मनसेतर्फे आंदोलन करण्यात आले. महामार्गावरील पाली (मठ) येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत महाआरती केली.
त्यानंतर प्रतिकात्मक गणेशाच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच त्यांना रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जाब विचारण्यात आला. यावेळी महामार्गाची युद्धपातळीवर डागडुजी करण्याची मनसेच्या दक्षिण रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली.
जिल्हा संपर्क अध्यक्ष सतीश नारकर, दक्षिण रत्नागिरी संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हाचिटणिस सुनिल साळवी, राजापूर सहसंपर्क अध्यक्ष शैलेश तांबे, रत्नागिरी तालुका उपाध्यक्ष राजू पाचकुडे, राजापूर तालुका उपाध्यक्ष पंकज पंगेरकर, महेश मयेकर, संजय गोरे, लांजा शहर अध्यक्ष दिलीप लांजेकर, महिला शहर अध्यक्ष स्वरा राजेशिर्के, अखिल शाहू, अजिंक्य केसरकर, जयेश फणसेकर, सोम पिलणकर, प्रशांत कुडाळकर, मोरेश्वर बाचरे, विनायक वाडेकर, रवी नारकर अक्षयकुमार ठीक तसेच रत्नागिरी, लांजा, राजापूर येथील अनेक मनसे पदाधिकारी उपस्थित होते.