(संगमेश्वर/प्रतिनिधी)
पावसाळ्यात कोकणातील निसर्ग असा काही बहरतो त्याची विविध मनमोहक रुपे पहायला मिळतात. श्रावण महिन्यात उन पावसाचा खेळ सुरु झाल्यानंतर असंख्य रानफुले सृष्टी सौंदर्यात खरी भर घालतात. कोकणातील या रानफुलांबाबत जागरुकता यावी यासाठी मातृमंदिर संस्था देवरुख तर्फे ‘दीपकाडी’ सारखे अभिनंदनीय उपक्रम हाती घेतले गेले. निसर्गाची एक अद्भुत किमया पाहायला मिळाली आहे ती म्हणजे मोर खरचुडी वेलीची. या वेलिवरील फुले म्हणजे निसर्गातील अद्भूत किमयाच ! या वेलीतून चक्क हुबेहूब पक्षाच्या चोचींचे आकार दिसून येत आहे. रत्नागिरीतील निसर्गप्रेमी आशु साळवी यांनी या वेली कोठे आहेत हे शोधले आणि नेत्रा पालकर आपटे यांनी मोर खरचुडीच्या फुलांची सुंदर छायाचित्रे मोठ्या मेहनतीने मिळवली.
मोर खरचुडी फुलांची छायाचित्रे काढण्यासाठी नेत्रा पालकर आपटे गेले काही दिवस निसर्गात भ्रमण करीत होत्या . गत आठवड्यात त्यांना ही वेल सापडली असल्याचे आशु साळवी यांनी सांगितले. मात्र दुसऱ्याच दिवशी या वेलींवर नळपाणी योजनेचे मोठे पाईप आणून टाकल्याने या वेली आणि त्यांना येणारी मनमोहक फुले अक्षरशः जमिनदोस्त झाली. या घटनेमुळे नेत्रा यांच्या नेत्रात अश्रूच तरळले. खूप कालावधीनंतर मोर खरचुडीची छायाचित्रे मिळण्याची उपलब्ध झालेली संधी पाणी योजनेच्या पाईपनी क्षणात हिसकावून नेली.
जो खरा निसर्ग अभ्यासक असतो, तो आपली जिद्द सोडत नाही. आशु साळवी यांनी अन्यत्र ही वेल शोधली मात्र तेथे जवळ जावून छायाचित्र घेणं नेत्रा यांना शक्य होत नव्हते त्यामुळे परत एकदा पदरी निराशा आली. अखेर निसर्गात भटकंती करत असताना त्यांना एका रविवारी तीन ठिकाणी मोर खरचुडीच्या वेली आढळल्याचे आशु साळवी यांनी सांगितले आणि त्यांनी क्षणाचाही विलंब न करता या फुलांची अनेक छायाचित्रे घेतली. या वेलींवर कळ्या आणि फुले फुललेली असल्याने हे नेत्रदीपक दृष्य निसर्ग प्रेमींपर्यंत पोहचविण्यासाठी नेत्रा पालकर आपटे यांनी कल्पकतेने हे सारे छायाबध्द केले.
सध्या सर्वत्र सडे विविध फुलांनी बहरलेत. पांढरा, गुलाबी, जांभळा, पिवळा, हिरवा असे रंग सड्यांची माळरानाची शोभा वाढवत आहेत. मोर खरचुडी म्हणजे मोर सेरोपेगिया ही वनस्पती पश्चिम घाटातील अति पाऊस असलेल्या भागात आढळते. हीची पाने लांब देठाची व अंडाकृती असतात. या वनस्पतीची फुले ही शोभेची आहेत. फुलांचा खालील भाग फुगीर असतो फुलांच्या एकूण लांबीच्या १/३ भाग तो व्यापतो. फुलांचे देठ पातळ आणि वरील दिशेने रुंद होत जाणारे असते. रंग गडद ठिपक्यांसकट गुलाबी असतो. पाकळ्या गडद रुबी रंगाच्या आणि फुलांच्या तिसऱ्या भागात पांढरा पट्टा दिसून येतो. साताऱ्यातील अविनाश भगत यांनी या वनस्पतीचा शोध लावला आहे.
छाया : नेत्रा पालकर-आपटे