(जाकादेवी/ वार्ताहर)
माध्यमिक विद्यालय वरवडे भाग शाळा वाटद खंडाळा आणि श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथे भारतीय तटरक्षक दलातील अधिकारी यांनी इयत्ता बारावी विज्ञान आणि वाणिज्य च्या सर्व विद्यार्थ्यांना भारतीय तटरक्षक दलातील करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी मुख्याध्यापक श्री जयवंत देशमुख यांनी तटरक्षक दलाचे अधिकारी,वाटद गावचे माजी सरपंच श्री अनिकेत सुर्वे यांचे स्वागत केले.
भारतीय तटरक्षक दल, जयगड चे अधिकारी श्री सुमित कुमार सिंह तसेच श्री विक्रांत कटारे यांनी भारतीय तटरक्षक दलाविषयीची माहिती दिली. तटरक्षक दलाचे अधिकारी पदावर काम करत असताना आपली भूमिका कोणती याविषयी उत्तम असे मार्गदर्शन केले. तसेच तटरक्षक दलातील अधिकारी पदावर काम करण्यासाठी आवश्यक पात्रता, परीक्षा पद्धती, तटरक्षक दलाकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा, प्रशिक्षण इत्यादी बाबत सविस्तर माहिती दिली. तटरक्षक दलाच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या सेवा सुविधा पुरविण्यात येत असून भारतीय तटरक्षक दल हे आपल्याला करिअरची उत्तम संधी देते याचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. तटरक्षक दलातील विविध विभागामध्ये आपल्याला रोजगाराची उत्तम संधी आहे आणि ती आपण प्राप्त करावी याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन आदरणीय सुमित कुमार सिंह आणि विक्रांत कटारे यांनी केले.
याप्रसंगी वाटद गावचे माजी सरपंच अनिकेत सुर्वे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी भारतीय तटरक्षक दलामध्ये अधिकारी पदावर जाण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत आणि त्यासाठी आवश्यक ती माहिती घेऊन तसा प्रयत्न करावा. आपली मानसिकता बदलून अधिकारी पदावर विराजमान होण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावेत असे सांगितले.
आरएसएस जनकल्याण कमिटी, रत्नागिरी यांच्या वतीने श्री मंदार जोशी यांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाला कोरोना किट भेट स्वरूपात मुख्याध्यापक श्री देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले. त्याचबरोबर श्री मंदार जोशी यांनी आपल्या मनोगतातून आपण आरोग्याच्या प्रश्नाबाबत अधिक जागृत राहिले पाहिजे. शासकीय स्तरावरून आपल्याला आवश्यक त्या सेवा सुविधा उपलब्ध होत नसून त्या सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आपण प्रयत्नशील रहावे असे मार्गदर्शन केले.
या संपूर्ण कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्री. सुनिल कांबळे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा.श्री.जगताप यांनी केले.