गुहागर-खेड-चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या हस्ते आज खेड तालुक्यातील घाणेखुंट येथे परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आणि हॉटेल वक्रतुंड या दोन ठिकाणी कोविड सेंटरची उदघाटने झाली. ही कोविड सेंटर सुरू होण्यामध्ये असलेल्या अडचणी व त्रुटींवर जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाशी बोलून आ. श्री. जाधव यांनी मार्ग काढला आणि आज ती सुरू करण्यात आली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सुसज्ज असलेल्या या कोविड सेंटरचा खूप मोठा फायदा लोटे विभागातील रुग्णांना होणार आहे.
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घाणेखुंट येथे लोटे औद्योगिक क्षेत्रातील सुप्रिया लाईफसायन्स कंपनीचे मालक श्री. सतीश वाघ यांच्या भरीव योगदानातून उभे राहिले आहे तर हॉटेल वक्रतुंड येथे डॉ. गौड यांच्या माध्यमातून सुसज्ज असे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. ही दोन्ही कोविड सेंटर प्रत्येकी ३० बेडची असून आज आ. श्री. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होऊन ती कार्यरत करण्यात आली.
परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आ. श्री. जाधव यांनी ही जागतिक महामारी असून प्रत्येकाने स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. त्याचवेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेंद्र आंब्रे यांनी बर्निंग हॉस्पिटलची केलेली मागणी योग्य असून त्यासाठीही पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी श्री. सतीश वाघ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री. शामसुंदर भाकरे, सुप्रिया लाईफसायन्स कंपनीचे श्री. वैद्य, खेड पंचायत समितीचे उपसभापती श्री. जीवन आंब्रे, प्रांताधिकारी श्री. अविशकुमार सोनोने, जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती श्री. सुनील मोरे, श्री. राजेंद्र आंब्रे, श्री. अरविंद चव्हाण, घाणेखुंटचे सरपंच श्री. अंकुश काते, लोटेचे सरपंच श्री. चंद्रकांत चाळके, श्री. मोहन आंब्रे, श्री. आल्हाद वरवाटकर आदी उपस्थित होते.