(संगमेश्वर)
15 ऑगस्ट 1947 साली ब्रिटिशांविरुद्धचा लढा भारतीयांनी यशस्वीपणे पूर्ण केला आणि त्यानंतर भारतात नव्या युगाचा प्रारंभ झाला. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी नवी दिल्ली येथे लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकावला आणि भारतीय गणराज्याची अधिकृत घोषणा झाली. या ऐतिहासिक घटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मागील स्वातंत्र्यदिनी याच लाल किल्ल्यावरून वर्ष 2021-22 हे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणुन साजरे करण्यात यावे अशी आग्रही भूमिका मांडली. आणि पूर्ण एक वर्षाने आपण सर्व लोक या अभियानाची व्याप्ती पहात आहोत. जो ज्याला जसे जमेल तसे या कार्यासाठी योगदान देत आहे. या सर्व गोष्टींचा मला एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून मनस्वी अभिमान वाटतो अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्ष, रत्नागिरी (द.) चे युवा मोर्चा कोषाध्यक्ष श्री. सतीश पटेल यांनी दिली.
मागील तीन दिवस प्रत्येक भारतीय मनाच्या घरी, दुकानात, कार्यालयात तिरंगा फडकावून ध्वजास मानवंदना दिली जात आहे. यामुळे एकंदरीत राजकीय धारणा काहीही असल्या तरी राष्ट्रकार्यात आम्ही एक आहोत ही एकतेची भावना दिसून आली. धर्म-जाती-प्रांत-भाषा हे भेद असले तरी आमचा देश एक आहे, आमचा ध्वज एक आहे, आम्ही सर्व भारतमातेची लेकरं आहोत आणि या नात्याने शालेय प्रतिज्ञेतील “सारे भारतीय माझे बांधव आहेत” अनुभवता येत आहे. खरच हे अतिशय मंतरलेले दिवस आहेत.
याचे श्रेय सर्व भारतीय नागरिकांना जाते. ही एकी चिरंतन काळासाठी टिकावी याचसाठी आपण आजचा स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापनदिन साजरा करत आहोत. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येकाने “त्वदियाय कार्याय बद्धा कटियम” या भावाने दृढसंकल्प करण्याची गरज आहे. हा संकल्प पूर्ण करून देशाच्या घडणीत आपण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो असेही मत सतीश पटेल यांनी व्यक्त केले.
देशाला एक द्रष्टा नेता मिळाला तर काय होऊ शकते याचा आदर्श वस्तुपाठ मा. मोदीजींनी घालून दिला आहे. त्यामुळे येणार काळ निश्चित भारताचा असणार यात शंका नाही. देशातील गरिबीचे प्रमाण काही अंशी घटत चालले आहे. नागरिक सक्षम झाले तरच देश सक्षम होणार. त्यामुळे आता पुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची वाटचाल समृद्धीच्या दिशेने असणार हे मात्र नक्की, असे सतीश पटेल म्हणाले.