(मुंबई)
भाजपने महाराष्ट्रातील कार्यकारिणीत महत्वपूर्ण बदल केले आहेत. महाराष्ट्रात भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर आशिष शेलार यांच्याकडे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुंबई भाजपचे अध्यक्षपद देऊन मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
शेलार यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदाची जबाबदारी देताच उद्धव ठाकरेंना ललकारल आहे. मुंबई महापालिकेतून भ्रष्टाचारी शिवसेनेला तडीपार करणार असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत. मुंबईतील भाजपाचे सर्व खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची मोठी टीम असून सगळे मिळून आम्ही आमचाच महापौर महाापालिकेत बसवू, असे आमदार अॅड आशिष शेलार यांनी जाहीर केले.
मुंबईतील रखडलेला कोस्टल रोड, मेट्रोच्या आरेतील कारशेडला अडवणे, रस्त्यावर पडलेले खड्डे, संगणक खरेदीमध्ये भ्रष्टाचार, शालेय साहित्य देण्यात झालेला विलंब अशी अत्यंत भ्रष्ट व्यवस्था मुंबई महापालिकेत असून मुंबईकरांना यापासून सुटका हवी आहे. ज्यांनी आतापर्यंत ठराविक कंत्राटदरांना पोसले व कंत्राटदारांनी ज्यांना पोसले त्यांना महापालिकेतून तडीपार करण्याची गरज आहे. मुंबईकरांची ही इच्छा पूर्ण होईल, असेही त्यांनी म्हटले.
शेलार यांनी यापूर्वी मुंबई भाजपचे अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. त्यामुळं मुंबई भाजपवर त्यांची पकड आहे. २०१७ च्या निवडणुकीत भाजपनं त्यांच्याच नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेची निवडणूक लढली होती. त्यात भाजपनं घवघवीत यश मिळवत सत्तेपर्यंत मजलही मारली होती. आता सत्तेची सारी सूत्र भाजपकडे असल्याने शिवसेनेला ही निवडणूक जड जाणार असल्याचे बोलले जात आहे. तर आशिष शेलार यांची मुंबई अध्यक्षपदी पुन्हा झालेली निवड हा निवडणूक रणनीतीचा एक भाग मानला जात आहे.