[ नवी दिल्ली ]
केंद्र सरकाने अटल पेंशन योजनेसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. या नव्या नियमावलीनुसार जे नागरिक प्राप्तिकर भरतात त्यांना अटल पेंशन योजनेचा लाभ घेता येणार नाही. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. १ ऑक्टोबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे. जे नागरिक प्राप्तिकर भरतात किंवा याआधी ज्या नागरिकांनी प्राप्तिकर भरला आहे, त्यांना १ ऑक्टोबर २०२२ पासून अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही, असे या आदेशात म्हटले आहे. एवढेच नाही तर १ ऑक्टोबरनंतर खाते उघडणाऱ्या खातेधारकांचे खाते देखील तात्काळ बंद करण्यात येईल.
अटल पेन्शन योजनेत ज्या व्यक्तींचे खाते असेल, त्यांच्या खात्यात आतापर्यंत जेवढी रक्कम जमा झाली असेल, तेवढी रक्कम खातेधारकांना देण्यात येईल. त्यानंतर त्यांचे खाते कायमचे बंद करण्यात येईल. हा नवा आदेश होण्याआधी ज्यांनी अटल पेन्शन योजनेत खाते खोलले असेल, त्यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकेल. १८ ते ४० वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक अटल पेन्शन योजनेचा लाभ घेऊ शकतो. त्यामुळे तुम्ही जर आधीपासूनच या योजनेसाठी अर्ज केला असेल किंवा पुढील महिन्यापर्यंत नव्याने अर्ज केला तरी नव्या आदेशाचा त्यांच्यावर परिणाम होणार नाही. ४ जूनपर्यंत नॅशनल पेंन्शन योजना आणि अटल पेन्शन योजनेचा लाभ घेणाऱ्या खातेधारकांची संख्या ५.३३ कोटी होती.