(जाकादेवी/संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील खालगाव ग्रामपंचायतीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त बुधवार दि.१० रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत खालगाव ग्रामपंचायतीपासून बाजारपेठ ते देऊड फाटा, देऊड फाटा ते गारवा हॉटेल पासून खालगाव सुतारवाडीपर्यंत ही भव्य बाईक रॅली काढली जाणार आहे. या मिरवणुकीत देशभक्तीपर गीते, क्रांतिकारकांची शौर्यगाथा नागरिकांना ऐकवली जाणार आहे.
रॅलीच्या दरम्याने शेतकरी वर्गाला शेती कामाचे साहित्य वाटप,तसेच खालगावातील नियोजित विकासकामांचे भूमिपूजन सरपंच प्रकाश खोल्ये व उपसरपंच कैलास खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे.
हर घर तिरंगा राष्ट्रीय उपक्रमांतर्गत खालगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरासाठी तिरंगा ध्वज वितरित करून घरांवर शंभर टक्के ध्वज फडकवण्यावर ग्रामपंचायतीने अधिक भर दिला असून तशा पद्धतीने वार्डनुसार कमिट्या स्थापन करण्यात आल्या आहेत. वार्डनुसार कमिटी स्थापन करून हर घर तिरंगा संदर्भात शासनाच्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शक सूचना विद्यमान सरपंच प्रकाश खोल्ये यांनी कमिटीला दिल्या आहेत.
ध्वजारोहण करताना पुरेशी माहिती घेऊन ध्वजाचा सन्मान राखला जावा. तिरंगा फडकवून आनंदोत्सव साजरा करावा. शासन संहिता पाळावी, शिक्षकांचे, अंगणवाडी सेविकांचे , ग्रामविकास अधिकारी यांचे मार्गदर्शन घेण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले. हर घर तिरंगा उपक्रमाची जनजागृती करण्याचे आवाहनही सरपंच यांनी नियोजनाच्या सभेत केले.
९ ऑगस्टपासून संपूर्ण गावात ध्वज वितरीत केले जाणार आहेत. शिवाय १२ ऑगस्ट रोजी खालगाव नं १ शाळेमध्ये ग्रामसभेचे आयोजित करण्यात आले आहे. तरी ग्रामसभेला गावातील ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे. बाईक रॅली यशस्वी व लक्षवेधी होण्याच्या दृष्टीने सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शासकीय व निमशासकीय कर्मचारी अधिक मेहनत घेत आहेत. बाईक धारकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन खालगाव ग्रामपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सर्व सामान्य नागरिकांना ध्वज फडकविण्याचे भाग्य लाभणार आहे. त्यामुळे सर्व-सामान्य जनतेच्या मनात नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे सरपंच प्रकाश खोल्ये उपसरपंच कैलास खेडेकर यांनी आवर्जून सांगितले.