( नवी दिल्ली )
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. महिलांच्या टी २० क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाचा ९ धावांनी पराभव झाला. तर सुवर्णपदक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने ‘प्रथम विजेता’ होण्याचा मान मिळवला आहे. भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. लढतीत भारताला २० षटकांमध्ये १६२ धावांचे लक्ष्य मिळाले होते. मात्र, भारतीय संघ १९.३ षटकांमध्ये सर्वबाद १५२ धावा करू शकला.
हा सामना एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिलांच्या टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.
भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मंधाना सहा तर शफाली वर्मा ११ धावा करून बाद झाल्या. हरमनप्रीत कौरने ४३ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. तर जेमिमाहने ३३ चेंडूत ३३ धावा केल्या.