(राजापूर / प्रतिनिधी)
राजापुरात शासनाच्या महानेट प्रकल्पचे अनधिकृत काम या अगोदर कित्येक वेळा शासनाच्या निदर्शनास माहिती अधिकार महासंघाने आणून दिले आहे. स्टरलाइट टेक्नॉलॉजी कंपनीच्या मुजोर ठेकेदारांकडून वारंवार नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यात अधिकारी वर्ग त्यांच्यावर कोणतेही कार्यवाही करताना दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग, राजापूर आणि सार्वजनीक बांधकाम विभाग रत्नागिरी उत्तर विभाग, तहसिल राजापूर, माहिती तंत्रज्ञान विभाग रत्नागिरी यांजकडून कोणतीही कार्यवाही आजतागायत होताना दिसत नाही. सार्वजनीक बांधकाम विभाग राजापूर याना अनेक पत्र देऊन सुध्दा स्टरलाइट कंपनी किंवा त्या संबधित अधिकारी वर्गाने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वारंवार संबधित कंपनीला साईड पट्टीवरील आणि गटार लाईन मधील पोल काढून इतरत्र हलवावे अशा प्रकारच्या सूचना देवूनही कोणतीही हालचाल होत नाही. रस्त्यावरील दुतर्फा बसविण्यात आलेले पोल आणि त्यावरून फिरविण्यात आलेली लाईन यामुळें अपघात होण्याची भीती बांधकाम विभागाकडून सुद्धा लेखी स्वरूपात वरिष्ठ कार्यलयात देऊनही संबधित कंपनी मूग गिळून गप्प आहे.
या सर्व कारणांमुळे आणि न्यायपासून वंचित राहिल्यामुळे माहिती अधिकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य सचिव श्री. समीर विजय शिरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली माहिती अधिकार महासंघाचे जिल्ह्यातील कार्यकर्ते १५ ऑगस्ट २०२२ स्वतंत्रदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यलायासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.
यासंदर्भात राजापूर तहसीलदार यांनी आठ 8 ऑगस्ट 22 ला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह एक बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये काय होते यावर लाक्षणिक संप होणार की नाही, यावर काही तोडगा निघतो का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.