(मुंबई)
शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमधील वाद आता विकोपाला पोहोचले आहेत. दोनच दिवसापूर्वी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुणे येथे हल्ला करण्यात आला होता. हे प्रकरण ताजे असतानाच शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच त्यांच्या पुत्रालाही ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून अनोळखी नंबरवरुन धमकीचे कॉल येत आहेत. गेल्या काही दिवसांत बाबांनाही या नंबरवरुन कॉल आले होते. आम्हाला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. शिंदे गटात सामील झाल्याने या धमक्या येत आहेत, अशी माहिती भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांनी दिली आहे.
हा आम्हाला उसकवण्याचा प्रयत्न आहे. आतापर्यंत सातत्याने गाडी फोडण्याची भाषा केली जात होती. मात्र अखेर आता प्रत्यक्षात हल्ला करण्यात आला आहे. आम्हीही शांत बसणार नाही. आम्हाला भिडू नका, तुमच्याही गाड्या आहेत, आम्हीही फोडू शकतो, अशी संतप्त प्रतिक्रिया भरत शेठ गोगावले यांनी दिली आहे. हा भ्याड हल्ला आहे, ही मर्दानगी नाही असेही ते म्हणाले.