(रत्नागिरी / प्रतिनिधी )
मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षे सुरु आहे. या महामार्गावर अपघातात दरवर्षी शेकडो मृत्यू होतात. काहीजण जायबंदी होतात या वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास प्राधिकरणाकडून आयआरआय (इंटिग्रेटेड रोड अॅक्सिडंट डाटा बेस) हे अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून अपघातांचे विश्लेषण करण्यात येणार आहे. अपघातांची कारणमीमांसा शोधून त्यावर उपाययोजना करण्यात येणार आहेत.
यामध्ये महामार्गावरील अवघड वळण काढणे, रुंदीकरण करणे तीव्र चढाव किंवा उतार कमी करणे इतर दुरुस्ती केली जाणार आहे. अपघातप्रवण क्षेत्रांची दुरुस्ती करुन रस्ते अपघात कमी करणे हा या अॅपचा मुख्य उद्देश आहे.
अपघाताशी संबंधित विभागांचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे. पोलीस दल, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यांचा समावेश असेल. यातील अधिकार्यांचे येत्या चार दिवसांत मुंबई येथे प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर त्याची प्रत्यक्षात कार्यवाही होणार आहे.