(जाकादेवी /वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालयात थोर देशभक्त- क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी तर साहित्यसम्राट -लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
प्रारंभी इ ५वी ते१२ वी पर्यंंतच्या विद्यार्थ्यांनी वर्गवार थोर क्रांतिकारक लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन केले.वर्गवार कार्यक्रमाचे औचित्य साधून सुंदर रांगोळीने वर्ग सजावट करण्यात आली. त्यानंतर वर्गवार निवडक विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग कथन केले. अनेक छोट्या मोठ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण भाषणे करून अतिशय क्रांतिकारक विचार व्यक्त केले. राष्ट्रपुरुषांचे कार्य नव्या पिढीला अवगत होण्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी थोर राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, साहित्यिक,संत-महात्म्य यांची पुस्तके, चरित्रे वाचावीत आणि स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास समजून घेण्याचे आवाहन प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.
हा संयुक्त कार्यक्रम सर्व वर्गशिक्षकांनी यशस्वीपणे पार पडला. वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने राबवला. सर्व वर्गशिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे, सांस्कृतिक विभागाचे,प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक भूपाळ शेंडगे यांनी खास कौतुक करून व मनापासून धन्यवाद दिले. विद्यार्थ्यांनाच कार्यक्रमाचे सूत्रसंचलन, अध्यक्षस्थान, भाषणे व आभारप्रदर्शनाची जबाबदारी मुख्याध्यापक बिपीन परकर यांनी दिल्याने विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. विद्यार्थी कार्यक्रमात रंगून गेल्याचा अनुभव यावेळी आला.