कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. देशातील मागील आठवड्यापासून रोज ४ लाख कोरोना रुग्ण संख्या आढळून येत आहे. याविषयीचे मुख्य कारण आता जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. भारतातील कोरोनावाढीसाठी कोविड-१९ चा एक व्हेरिएन्ट कारणीभूत असून त्याचा प्रसार वेगाने होत असल्याचे संघटनेचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. व्हायरसचा नवा व्हेरियंट अधिक संसर्गक्षम असल्याचे ते निदर्शक आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत विषाणूचा वेगाने प्रसार होत आहे आणि अधिकाधिक व्यक्तींना संसर्ग होत आहे.
कोरोनाचा व्हेरियंट फैलावाचे कारण
स्वामीनाथन यांनी कोरोनाचा B.1.617 हा व्हेरियंट भारतातील कोरोनाच्या स्फोटाचे महत्त्वपूर्ण कारण असल्याचे म्हटले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रथमच या प्रकारचा विषाणू आढळला होता. ‘कोरोना प्रकरणात झालेल्या वाढीमागे अनेक गोष्टी आहेत आणि वेगाने पसरणारा कोरोनाचा व्हेरियंट त्यापैकी एक आहे,’ असे त्यांनी म्हटले. अमेरिका आणि यूके सारख्या देशांव्यतिरिक्त बरीच राष्ट्रीय आरोग्य अधिकारी B.1.617 या व्हेरियंटला गंभीरपणे घेत असून जागतिक आरोग्य संघटनाही यावर काही उपाययोजना करता येतील का हे पाहणार असल्याचे यावेळी त्यांनी म्हटले. डब्ल्यूएचओच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी, ‘बी 1.617 चे प्रकार चिंताजनक आहेत कारण त्यात काही म्यूटेशन आहेत ज्यामुळे संसर्ग वाढतो आणि लस किंवा नैसर्गिक संसर्गामुळे शरीरात तयार होणाऱ्या अँटीबॉडी रोखण्यास मदत करत असल्याचे म्हटले आहे.
Post Views: 68