( संगमेश्वर / प्रतिनिधी )
दूध आणण्यासाठी बाजारात गेलेल्या महिलेला रस्त्यात चक्कर येऊन पडल्याने आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद देवरुख पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली होती. मात्र आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. पोलिसांच्या अधिकच्या तपासात असे दिसून आले आहे की हा आकस्मिक मृत्यू नसून आत्महत्या आहे. त्याबाबतची चिठ्ठी महिलेच्या घरात सापडली आहे. दीप्ती अभिजीत पवार (28) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, महिलेच्या पतीने पोलिस स्थानकात फिर्याद दिली होती की, खालची आळी येथे पत्नी नेहमीप्रमाणे दूध आणण्यासाठी गेली होती. घरी येताना चक्कर येऊन रस्त्यावर बेशुद्ध पडल्याने तिला देवरूख ग्रामीण रुग्णालयात देण्यात आले. तिथे तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले अशी फिर्याद अभिजित पवार (31, मच्छी मार्केट देवरुख) याने दिली होती. ही घटना रविवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. पतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
या घटनेचा तपास देवरुख पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव करत होते या तपासा दरम्यान त्या महिलेच्या घरात एक चिठ्ठी सापडली. यामध्ये आपला पती कायम संशय घेतो, मारहाण करतो असे नमूद करण्यात आलेले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली.
या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीनिवास साळुंखे यांनी सोमवारी दिले. त्यानंतर पोलीस निरीक्षक जाधव यांनी मृत महिलेच्या नातेवाईकांची चौकशी केली. यादरम्यान अभिजीत पवार याच्यावर पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.