ज्या ठाण्याने पहिल्यांदा सत्ता दिली त्याच ठाण्यात घात झालाय… गद्दारीचा शिक्का बसलाय… छातीवर नाही तर अगदी पाठीवर वार झालाय… गद्दारांना क्षमा नाही असं तुम्हीच बोलला होता. पण साहेब, काळजी करू नका. आम्ही जिवाची बाजी लावू, ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीद कदापिही पुसू देणार नाही. पुन्हा एकदा तुमचा शिवसैनिक या वादळातही पहाडासारखा उभा राहील. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्यासोबत असू द्या आणि पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा, अशी भावनिक साद खासदार राजन विचारे यांनी शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना पत्राद्वारे घातली आहे.
शिवसेनेशी गद्दारी करून ठाण्यातील नगरसेवक, आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झाले. त्यातील अनेक जण आम्ही आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत असल्याचा दावा करीत आहेत. मात्र शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी आज या गद्दारांचा बुरखा आनंद दिघे यांनाच जाहीर पत्र लिहून टराटरा फाडला. आपल्या भावनांना वाट मोकळी करताना विचारे यांनी म्हटले आहे : साहेब, आज तुम्हाला जाऊन 21 वर्षे उलटली. पण असा एकही दिवस नाही की तुमची आठवण आली नाही. आज जरा जास्त आठवण येतेय. वयाच्या 16व्या वर्षापासून आम्ही तुमच्यासोबत काम करत आलो. लढलो, धडपडलो. या सगळया प्रवासात तुम्ही माझ्यासोबत होतात. अजूनही अंधारात वाट दाखवत सोबतच आहात. अगदी धगधगत्या दिव्यासारखे.
फक्त शिवसैनिकच नव्हे, तर सर्वसामान्य मराठी माणूस सध्या अस्वस्थ झाला असून आज मीदेखील जितका अस्वस्थ आहे तितका पूर्वी कधीच नव्हतो. आता तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगू की घात झाला… दिघेसाहेब घात झाला… आणि हो, तोदेखील आपल्याच लोकांकडून….. म्हणूनच आज तुमची आठवण येतेय. या आधी जेव्हा असं झालं होतं तेव्हा गद्दारांना क्षमा नाही हे तुम्हीच बोलला होता ना साहेब? आज हे दुसरयांदा झालंय. फक्त तुम्ही सोबत नाही. मग यांना माफ तरी कसं करायचं आम्ही, असा आर्त सवाल राजन विचारे यांनी पत्रात केला आहे. तेव्हा तुम्हाला झालेल्या वेदना आम्हालाही आता होत आहेत. पण रडायचं नाही… लढायचं… हा विचार पुढे घेऊन जाणारी शिवसेना ही आपली संघटना आहे.
आनंदाश्रमाकडे पाहिलं आणि टचकन डोळय़ांत पाणी आलं
ठाण्यातील आनंदाश्रम आणि शिवसैनिक याचं नातं अगदी घट्ट आहे. त्याचा उल्लेख आनंद दिघे यांना लिहिलेल्या पत्रात करताना राजन विचारे म्हणतात, साहेब… आज आनंदाश्रमाकडे पाहिलं आणि टचकन डोळय़ांत पाणी आलं. याच मंदिरात आम्हा सगळ्यांना तुम्ही शिवबंधन बांधलं होतं. आज काही जणांचं तेच बंधन माझ्या डोळय़ांसमोर तुटताना बघतोय म्हणून जरा गहिवरून येतंय साहेब…..
जिवाची बाजी लावू, पण संघटना नव्याने उभारू
कोणत्याही पदापेक्षा पिंवा वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना, पक्ष महत्त्वाचा आहे. तुमची हीच शिकवण सोबत घेऊन आम्ही मानाने मिरवत पुढे जाऊ. साहेब काळजी नसावी. तुमचा राजन विचारे आणि सगळे सच्चे शिवसैनिक आपली संघटना पुन्हा नव्याने उभारण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी आम्ही जिवाची बाजी लावू. पण “शिवसेनेचे ठाणे… ठाण्याची शिवसेना’ हे ब्रीदवाक्य कदापि पुसू देणार नाही याची ग्वाहीच पत्रात देण्यात आली आहे. कितीही जण गेले तरी तुमचे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आमच्यासोबत आहेत. त्यामुळेच पुन्हा एकदा शिवसैनिक या वादळात पहाडासारखा उभा राहील. फक्त तुमचा आशीर्वाद आणि सोबत असू द्या, असा दुर्दम्य निर्धार विचारे यांनी तमाम शिवसैनिकांच्या वतीने पत्राद्वारे व्यक्त केला आहे.