(चिपळूण)
चिपळूण येथील ज्येष्ठ साहित्यिक, इतिहास आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते प्रकाश देशपांडे यांनी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला नुकताच अकरा हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश प्रदान केला. वाचनालयाचे अध्यक्ष सुनील खेडेकर यांनी या देणगी निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करताना, आंबेडकर वाचनालयाच्या स्थापनेत आणि आजवरच्या वाटचालीत देशपांडे यांचा फार मोठा वाटा असल्याचे नमूद केले.
आपल्या अमृतमहोत्सव महोत्सवी वर्षात सामाजिक कामातून अलिप्त होण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशानुसार देशपांडे यांनी ‘लोटिस्मा’ वाचनालयाच्या कार्याध्यक्ष पदावरून निवृत्ती स्वीकारली. ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेने अमृतमहोत्सव निमित्ताने नुकताच प्रकाश देशपांडे यांचा भव्य सत्कार समारंभ घडवून आणला होता. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते संपन्न झालेल्या या भव्य सत्कारावेळी प्रकाश देशपांडे यांची ग्रंथतुला करण्यात आली होती. यावेळी देशपांडे त्यांच्या आजवरच्या सामाजिक आणि ग्रंथालय चळवळीतील कार्याचा आढावा घेणारा गौरवग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. मानपत्र, तैलचित्र आणि एक लाख एक हजार एकशे अकरा रुपयांची थैली असे या सत्काराचे स्वरुप होते. सत्कारावेळी मिळालेल्या थैलीतील रक्कम देशपांडे यांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्थांना देणगी रुपाने देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार देशपांडे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयासह लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, ज्ञानरश्मि वाचनालय गुहागर, श्रीकृष्ण व्याख्यानमाला चिपळूण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, डॉ. तात्यासाहेब नातू प्रतिष्ठानचे विद्यार्थी वसतिगृह देवखेरकी या संस्थांना ही रक्कम देणगी म्हणून विभागून दिली.
ही देणगी आमच्यासाठी अमूल्य आणि अनुकरणीय प्रेरणा आहे, अशी प्रतिक्रिया वाचनालयाचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे सचिव सुमेध करमरकर यांनी दिली. याच भावनेतूनच सर्व संचालकांनी उपस्थित राहून सामुदायिकपणे हा धनादेश स्वीकारल्याचे करमरकर यांनी म्हटले. यावेळी अध्यक्ष सुनील खेडेकर, उपाध्यक्ष रमण डांगे, सचिव सुमेध करमरकर, संचालक प्राची जोशी, पवार सर, अण्णा म्हाडदळकर, सुरेश जाधव, अरुण इंगवले आणि वाचनालयाचे कर्मचारी उपस्थित होते.