आरोग्य मंत्रालयाने को -विन पोर्टलची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून यापुढील काळात लहान मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या पोलिओ, हिपॅटायटिससहित इतर प्रकारची लस घेण्यासाठी नागरिकांना को-विन पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर. एस. शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
वर्ष 2020 मध्ये कोरोनाचे संकट आल्यानंतर नागरिकांना कोरोना नियंत्रणासाठीची लस घेता यावी, याकरिता केंद्र सरकारने को विन पोर्टल तयार केले होते. या पोर्टलला जबरदस्त यश मिळाले आणि पोर्टलमुळे देशभरातील नागरिकांना प्रभावीपणे कोरोनावरील लस देता आली होती. को-विन पोर्टलचा वापर लहान मुलांसाठी दिल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या लसींसाठी केला जाण्याचा निर्णय त्यामुळे घेण्यात आला असल्याचे डॉ. शर्मा यांनी सांगितले.
येत्या काही महिन्यात नागरिकांना पोलिओ, हिपॅटायटिससहित इतर लसी मुलांना देण्यासाठी को-विन पोर्टलवर नोंदणी करता येईल, असे सांगून शर्मा पुढे म्हणाले की, नवीन लसींसाठी को-विन पोर्टलचा अवलंब केला जाणार असला तरी या पोर्टलवरील जुने फ्यूचर्स तसेच राहतील. यामुळे लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेवर लक्ष ठेवता येणे सुलभ होईल.