(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भर रस्त्यात विवाहितेची छेडछाड काढूत तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणार्या एका आरोपीला न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी व 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्याच्या सोबतचा मुख्य आरोपी असलेल्या मनोज तांबे याचा मृत्यू झाला आहे. सहआरोपी सचिन सुवरे (मांडवी) याला मात्र शिक्षा सुनावली आहे. ही घटना 30 नोव्हेंबर 2012 रोजी रात्री 8.45 वा. च्या सुमारास खेडशी येथे घडली होती. याप्रकाराबाबत पीडित विवाहितेने ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
सविस्तर वृत्त असे की, शहरानजीकच्या खेडशी येथे मुख्य आरोपी मनोज तांबे (26, मांडवी रत्नागिरी) हा पीडितेला वारंवार फोन करुन मला भेटायचे आहे, असे सांगायचा. 30 नोव्हेंबर 2012 रोजी मनोज याने खेडशी येथील पारसनगर येथे महिलेला रस्त्यात अडवून गाडीवर बस फिरायला जाऊया असे म्हणून अश्लिल हावभाव करुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यावेळी त्याचा सहकारी तिथे आला. त्यामुळे या पीडितेने त्याच्या मित्राविरोधातही तक्रार दाखल केली.
या खटल्याची सुनावणी न्यायालयात सुरु होती. दरम्यानच्या काळात मुख्य आरोपी असलेल्या मनोजचा मृत्यू झाला. या खटल्याचा निकाल देताना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी माणिकराव सातव यांनी अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन निकाल देत सहआरोपीला 3 दिवस पोलीस कोठडी आणि 7 हजार रुपयांचा दंड सुनावला.