(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील मॉडर्न इंग्लिश स्कूल बुरंबाड येथे डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. सहशिक्षिका कु. नमिरा शेकासन यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले. त्यानंतर विद्यार्थी प्रतिनिधी कु. मारिया खतिब व कु. आराध्य रजपूत यांनी प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले.
यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री. योगेश मुळे यांनी विद्यार्थ्यांना ए.पी.जे. अब्दुल कलाम सरांचा जीवनप्रवास उलगडून सांगितला. रामेश्वरम येथे घरोघरी पेपर टाकणारा सामान्य मुलगा ते देशातील अत्यंत बुद्धिमान वैज्ञानिक व त्यानंतर देशाचे 12 वे राष्ट्रपती म्हणून देशाची केलेली सेवा सारे काही उत्तुंग होते. याच मधल्या काळात ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणुन कार्यरत होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारताने आपली दुसरी अणुचाचणी पोखरण येथे केली होती. त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे आत्मचरित्र ‘अग्निपंख’ विद्यार्थ्यांनी अवश्य वाचावे असा आग्रह मुख्याध्यापकांनी धरला.
कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात सौ. मयुरी करंजेकर यांनी आभार मानून अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. अमोल भागडे यांनी केले तर वृत्तांकन कु. ऋतुजा धामणस्कर यांनी केले.