(लांजा)
साखरपा नजीकच्या पुर्ये येथील महावितरणचे विद्युत खांब हे धोकादायक अवस्थेत आहेत. काही खांब गंजून गेल्यामुळे ते पडण्याचा धोका निर्माण झाला असून, त्याची तक्रार करूनही अद्याप दखल घेतलेली नाही. पुर्ये धनगरवाडी येथील महावितरणचे लोखंडी खांब धोकादायक अवस्थेत आहेत. तीन खांब हे पायथ्याशी पूर्णत: गंजून गेले आहेत. परिणामी कधीही पडू शकतील अशा अवस्थेत आहेत.
वाडीतील संदीप कोलापटे यांच्या घराजवळ एक खांब असून वाडीतील अन्य घरांना त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. याबाबत संदीप कोलापटे यांनी जानेवारी महिन्यात ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली होती. त्या तक्रारीची दखल अद्याप घेण्यात आलेली नाही. या सगळ्या भोंगळ कामकाजाविरोधात सरपंच बापू लोटणकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ऑनलाईन तक्रारीकडेही दुर्लक्ष होत असेल तर दाद कोणाकडे मागायची ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एखादी दुर्घटना घडल्यावरच महावितरणला जाग येणार आहे का ? असेही त्यांनी विचारले आहे