मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात नुकत्याच करण्यात आलेल्या 3 तक्रारींप्रकरणी आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गोपनीय चौकशी करण्यात सुरुवात केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे परमबीर यांनी पुन्हा चौकशीला सामोरं जावं लागणार आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी असताना परमबीर सिंग यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार ज्येष्ठ पोलीस निरीक्षक भिमराज घाडगे यांनी पोलीस महासंचालक तसंच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. या सोबतच परमबीर सिंग यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांनी भिमराज घाडगे यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार भिमराज घाडगे यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली.
यामध्ये पराग मनेरे, संजय शिंदे, सुनील भारद्वाज, विजय फुलकर या चार पोलीस उपायुक्तांच्या डझनभर पोलीस अधिकार्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या तक्रारीवरून सिटी कोतवाली पोलिसांनी माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
परमवीर सिंग यांच्यासह तब्बल 27 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार असून या प्रकरणाचा तपास आता ठाणे पोलिसांकडून करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. परमबीर सिंग यांच्याविरुद्ध हा पहिला गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा वर्ग झाल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तीन महिन्यात ही चौकशी पूर्ण केली जाणार आहे. ही प्राथमिक स्वरुपाची चौकशी आहे. यात सर्व साक्षीदार आणि तक्रारदारांचा जबाब नोंदवला जात असतो.
तर दुसरीकडे, क्रिकेट बुकी सोनू जलाल याने सुद्धा परमबीर यांच्यावर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी वसुली केल्याचा आरोप बुकी सोनू जलालनं केला होता. विशेष म्हणजे, सोनू जलानने याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांना लेखी पत्र लिहून तक्रार केली.
सोनू जलाल यानं लिहिलेल्या पत्रामध्ये परमबीर सिंग यांनी 2018 मध्ये 3 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली होती, असा आरोप केला. मकोका गुन्हा लावून खंडणी वसूल केल्याचं या पत्रात म्हटलं आहे. विशेष म्हणजे, या पत्रामध्ये प्रदीप शर्मा आणि कोथमिरे यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आल्याची माहिती मिळाली. याशिवाय केतन तन्ना यांनीही परमबीर सिंग यांच्यावर वसुलीचे आरोप केला आहे. सव्वा कोटी रुपयांची वसुली केल्याचा त्यांनी दावा केला आहे. या प्रकरणाची दखल गृहखात्याने तत्काळ घेतली असून डीजीपी ऑफिसमधून हे प्रकरण स्टेट सीआयडीला वर्ग केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.