(मुंबई)
मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करण्याचा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यानुसार येत्या 1 ऑगस्टपासून महाराष्ट्रात मतदार ओळखपत्र आणि आधार कार्ड जोडणीसाठी विशेष अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अप्पर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारी दिली.
मतदार याद्यांचे प्रमाणीकरण, दुबार नावे वगळणे, यासाठी आयोगाने मतदार ओळखपत्र आधार कार्डशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोहीम राज्यभर येत्या 1 ऑगस्टपासून राबविण्यात येणार आहे. आधार कार्डशी मतदार ओळखपत्र संलग्न करण्यासाठी अर्ज क्रमांक 6 ब भरावा लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ, राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ, नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल, व्होटर हेल्पलाईन या ठिकाणी हा फॉर्म ऑनलाईनही भरता येणार आहे. त्यासोबतच ऑफलाईन पद्धतीने आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र जोडणीचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. त्यासाठी राज्यभरात विशेष शिबिरे भरविली जाणार असल्याचे श्रीकांत देशपांडे यांनी स्पष्ट केले.
मात्र, आधार संलग्न करणे हे बंधनकारक नसून, ऐच्छिक आहे. आधारशी संलग्न केले नाही म्हणून कोणत्याही मतदाराचे नाव वगळण्यात येणार नाही. तसेच आधार क्रमांकाची गोपनीयता अबाधित ठेवण्यात येईल. आयोगातील कोणत्याही कर्मचाऱ्याने जर ही गोपनीयता भंग केली, तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी सांगितले.
आधार क्रमांक संलग्न करणे ऐच्छिक आहे. त्यामुळे मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना 6 ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटो असलेले किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड, एनपीआरअंतर्गत आरजीआयद्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटो असलेले पेन्शन कागदपत्रे, केंद्र-राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार-खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या 11 पर्यायांपैकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.