(लांजा / प्रतिनिधी)
लांजा तालुक्यातील अंजणारी बौध्दवाडी येथे गुरे चरवण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा पटरी ओलांडताना रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना 23 जुलै रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. अनंत पांडुरंग शिखरे (49, अंजणारी शिखरेवाडी, लांजा) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद श्रध्दा विनायक सरपोतदार (53, अंजणारी लांजा) यांनी पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंत शिखरे हे 23 जुलै रोजी सकाळी गुरे चरवण्यासाठी अंजणारी येथे जंगलात घेवून जात होते. अंजणारी बौध्दवाडी येथे रेल्वे पटरी ओलांडताना रेल्वेचे आवाज न ऐकल्यामुळे अचानक रेल्वेने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत रेल्वेखाली सापडून त्यांचा मृत्यू झाला. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार कांबळे करत आहेत.