(रत्नागिरी)
पाच जिल्ह्यातील मनोरुग्णांचा भार असलेल्या येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील कर्मचाऱ्यावर रिक्तपदांमुळे प्रचंड ताण वाढला आहे. एकूण मंजूर पदांपैकी ५० टक्केच्या वर पदे रिक्त आहेत. पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र त्यावर अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. कोरोना काळात रुग्णसंख्या कमी होती. मात्र आता ती वाढल्यामुळे कार्यरत असलेले कर्मचारी हैराण आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि मिरज या पाच जिल्ह्यांसाठी येथा प्रादेशिक मनोरुग्णालय आहे. रुग्णालयात आता २०० मनोरुग्ण आहेत. त्यांच्या देखभालीची मोठी जबाबदारी वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांवर आहे. एकूण १४४ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ६४ पदे रिक्त आहेत. यामध्ये वर्ग १ चे १ पद रिक्त आहे. चतुर्थश्रेणीतील ३८ पदे, ब गटातील ३ आणि क गटातील १७ पदांचा यामध्ये समावेश आहे.
रुग्णांची संख्या अधिक असल्याने या रुग्णांची देखभाल करण्यासाठी आवश्यक असलेल्या चतुर्थ श्रेणीतील संवर्गातील कर्मचाऱ्याची सर्वाधिक पदे रिक्त आहे. मनोरुग्ण असल्याने या रुग्णांच्या नैसर्गिक विधीसह, त्यांच्या नाष्टा-पाणी जेवणाची आणि विश्रांतीसंदर्भातील जबाबदारी या संवर्गातील कर्मचाऱ्यांवर असते. धोकादायक रुग्ण स्वतंत्र असले तरी काही रुग्ण एकाच ठिकाणी असतात. त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने रुग्णालय प्रशासनाला लक्ष ठेवावे लागते. कोरोना काळामध्ये रुग्णांची संख्या कमी होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर तेवढा ताण नव्हता.
मात्र आता रुग्ण संख्या २०० आहे. एवढ्या रुग्णांची देखभाल करताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ येत आहे. रुग्णालय प्रशासनाने ही रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावी, यासाठी वारंवार शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. अनेक नातेवाईक मनोरुग्णांना दाखल करून निघुन जातात. काहीवेळा खोटा पत्ता देतात. त्यामुळे बरे झालेले अनेक रुग्ण नातेवाईकच नसल्याने रुग्णालयात आहेत.
कोकण रेल्वेमुळे अन्य राज्यातील मनोरुग्ण देखील दाखल होतात. काही संस्था मनोरुग्णांना योग्य उपचार मिळावा यासाठी त्यांना दाखल करतात. रुग्ण वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण पडत आहे.